राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत लोकहिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी मानले राज्य सरकारचे आभार
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत लोकहिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकार आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली, मानधनात वाढ आणि अनुकंपा धोरण लागू करून सरकारने कोतावालाना दिलासा दिला आहे. ग्राम रोजगार सेवकांचे मानधन ८ हजार करण्यात आले आहे. ऑरेंज गेट ते मरीन drive भुयारी मार्ग तसेच ठाणे वर्तुळाकार मेट्रोला गती देण्याचा निर्णय घेऊन मुंबईच्या पायाभूत सुविधा विकासाला आणखी चालना देण्यात आली आहे. देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना सुरु करण्याचा निर्णय घेऊन गाईंचे देशी वाण जपण्याचा कौतुकास्पद प्रयत्न सरकारने केला आहे. सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ, आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ स्थापण्याचा निर्णय देखील दोन्ही समाजासाठी महत्वाचा आहे. पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यावत करण्याचा निर्णय ही कोल्हापूरवासियांसाठी भेट ठरेल. केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयामुळे दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग येणार आहे. आज लोकहिताचे अनेक निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आणि मंत्रिमंडळातील माझ्या सर्व सहकार्यांचे मनःपूर्वक धन्यवाद, असे पाटील यांनी म्हटले.