मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा…. मराठी भाषिकांचा स्वाभिमान वाढविल्याबद्दल मोदी सरकारचे मनःपूर्वक आभार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

59

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे. गेल्या कित्येक वर्षांची मराठी भाषिकांची आग्रहाची मागणी या निमित्ताने भारत सरकारने मान्य केली आहे. या निर्णयाच्या रूपाने मराठी भाषिकांचा स्वाभिमान वाढविणारा निर्णय घेतल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोदी सरकारचे तसेच सर्व मराठी भाषिकांचे अभिनंदन केले.

भारत सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करताना मातृभाषेला महत्त्वाचे स्थान दिले आहे. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असल्याने देशभरातील ४५० विद्यापीठांमध्ये मराठी भाषेत शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. मराठी भाषा, बोलीभाषांचे संशोधन,लेखन, अनुवाद यासह मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी म्हणून या निर्णयामुळे मोलाची मदत होणार आहे. शिवाय, राज्यातील सार्वजनिक ग्रंथालये अधिक सशक्त करुन त्यांच्यामार्फत मराठी भाषा आणि साहित्य, ग्रंथनिर्मिती, ग्रंथसंग्रह अशांसाठी प्रोत्साहन मिळणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नाही तर ती अस्मितासुद्धा आहे. आपल्या मराठी भाषेला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हजारो वर्षांपासून मराठीने कोट्यवधी लोकांचे वैचारिक आणि सांस्कृतिक भरणपोषण केले. कधीकाळी मराठी भाषा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुखातून ऐकली गेली असेल तर कधी संत ज्ञानेश्वरांनी याच भाषेचा उपयोग समाज प्रबोधनासाठी केला असेल. हा विचार करून मन सुखावून जाते आणि ऊर अभिमानाने भरून येतो. आपल्या माय मराठीचे महात्म्य लक्षात घेऊन, तिला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल जगभरातील १५ कोटी मराठी भाषिकांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावतजी यांचे मनःपूर्वक आभार, असे पाटील यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.