कोथरुडमध्ये ‘धागा’ प्रदर्शनास चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट.. वस्त्रोद्योग धोरणाच्या अंमलबजावणीत प्रत्येकजण सहभागी होत आहे, हे पाहून समाधान वाटले – चंद्रकांत पाटील
पुणे : कोणतंही वस्त्र वैविध्यपूर्ण धाग्यांनीच बनतं. एकमेकांत गुंफून रहाणं हा धाग्याचा महत्वाचा गुणधर्म आणि तेच त्याचं सामर्थ्य सुद्धा आहे. हे सामर्थ्य ओळखूनच खा. मेधाताई कुलकर्णी यांच्या पुढाकारातून आणि रमाबाई आंबेडकर महिला सबलीकरण केंद्रातर्फे महिला सक्षमीकरणासाठी कोथरुडमध्ये ‘धागा’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज या प्रदर्शनाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन खरेदीचा आनंद लुटला.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, यावेळी महिलांनी तयार केलेली विविध उत्पादने पाहून एक वेगळा आनंद मिळाला. राज्याचे वस्त्रोद्योग धोरण नुकतेच जाहीर झाले. या धोरणामध्ये महिला सक्षमीकरणाला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. राज्याचा वस्त्रोद्योग मंत्री म्हणून हे प्रदर्शन पाहताना, वस्त्रोद्योग धोरणाच्या अंमलबजावणीत प्रत्येकजण सहभागी होत आहे, हे पाहून समाधान वाटले, असे पाटील म्हणाले. प्रत्येक कोथरुडकराने एकदा तरी या प्रदर्शनास भेट देऊन महिलांनी तयार केलेली उत्पादने आवर्जून खरेदी करावीत, अशी पाटील यांनी आग्रहाची विनंती यावेळी केली.