‘मृत्युंजय अमावस्या – धगधगत्या स्वाभिमानाचा जलज्वलनतेज अंगार’ या महानाट्याचा प्रयोग नामदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने कर्वेनगर कोथरूड येथे संपन्न
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य टिकवण्यासाठी मृत्यूशी झुंज देऊन शत्रूशी समर्थपणे लढणारा योद्धा म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ! धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा अंगावर शहारे आणणारा इतिहास आजही तुम्हा आम्हाला प्रेरणा देतो. छत्रपतींचा हा ज्वलंत इतिहास पुढच्या पिढीमध्ये रुजावा यासाठी नीलेश रमेश भिसे लिखित आणि दिग्दर्शित ‘मृत्युंजय अमावस्या – धगधगत्या स्वाभिमानाचा जलज्वलनतेज अंगार’ या महानाट्याचा प्रयोग उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने कर्वेनगर कोथरूड येथे पार पडला.
जवळपास ७० कलाकारांनी आपल्या अदाकारीतून १६८० ते १६८९ या कालखंडातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची धगधगती कारकीर्द हुबेहूब साकारली होती. शंभूराजांचे युद्ध नेतृत्व, त्यांचे वक्तृत्व, कल्पनाशक्ती, अचाट आणि अनोख्या युद्ध मोहिमा आणि अटक झाल्यानंतर औरंगजेबा बरोबरच्या तडाखेबंद जुगलबंदीने संपूर्ण वातावरणच भारावून टाकले होते. या सादरीकरणातील बलिदान प्रसंग सुरू असताना थोरा मोठ्यांबरोबरच चिमुकल्यांच्या डोळ्यात आलेल्या अश्रुंनी साऱ्यांचेच मन हेलावून गेले. या महानाट्यातुन राष्ट्रभक्तीची प्रेरणा समस्त उपस्थितांना नक्की मिळाली, यात शंका नाही, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
महानाट्याच्या उदघाटन प्रसंगी भाजपा पुणे शहर अध्यक्ष धिरज घाटे, सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष संदिप बुटाला, प्रसिध्द अभिनेते रमेश परदेशी, मनोज पोचट, वर्षाताई डहाळे, दिपक नागपुरे, दिपक पोटे, नवनाथ जाधव, सचिनभाऊ निवंगुणे, राजाभाऊ बेंद्रे, भुषण वर्पे, अमोल डांगे, हेमंत बोरकर, विवेक कुलकर्णी, निलेश म्हस्कुले उपस्थित होते.