विजया रहाटकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली महिला सशक्तिकरण, त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण कार्य घडेल – चंद्रकांत पाटील
मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थानच्या सह प्रभारी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विजया रहाटकर यांचे हार्दिक अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या विजया रहाटकर या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत. त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाचा असेल. विजया रहाटकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली महिला सशक्तिकरण, त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण कार्य घडेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. संवैधानिक दर्जा असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाला अत्यंत व्यापक अधिकार आहेत. महिलांच्या उन्नतीसाठी घटनात्मक आणि कायदेशीर मुद्दांचा फेरआढावा घेणे, संसदीय- वैधानिक शिफारशी करणे, महिलांविषयक धोरणात्मक बाबींसाठी केंद्र व राज्य सरकारांना सल्ला देणे, महिलांविषयक प्रश्नांचा संशोधन करणे, त्यांच्या अडीअडचणींची दखल घेऊन कारवाई करणे आदींचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. १९९२मध्ये विशेष कायद्यान्वये स्थापन झालेल्या या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. महाराष्ट्र भाजप युवा मोर्च्याच्या उपाध्यक्ष ते भाजप महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव असा त्यांचा प्रवास आहे. त्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या प्रदीर्घकाळ सदस्यादेखील राहिल्या आहेत. सध्या त्या राजस्थान भाजपच्या सहप्रभारी म्हणून पक्षाचे काम करत आहेत.