चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातील बाणेरकरांचं ग्रामदैवत श्री भैरवनाथ तसेच पाषाणचे ग्रामदैवत मारुती भैरवनाथाचे घेतले आशीर्वाद
पुणे : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठीची भारतीय जनता पार्टीची पहिली यादी रविवारी जाहीर झाली. भाजपाच्या वतीने कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. यानंतर राजकीय घडामोडींचा वेग आला आहे. आज पुणे जिल्ह्याच्या महायुतीची बैठक केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातील बाणेरकरांचं ग्रामदैवत श्री भैरवनाथ तसेच पाषाणचे ग्रामदैवत मारुती भैरवनाथाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेसाठी आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज कोथरुड मतदारसंघातील बाणेरकरांचं ग्रामदैवत श्री भैरवनाथांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर शिवतीर्थावर जाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर त्यांनी कोथरुड मतदारसंघातील पाषाणचे ग्रामदैवत मारुती भैरवनाथाचे देखील दर्शन घेतले. यावेळी उपस्थित नागरिकांशी देखील त्यांनी संवाद साधला. संवाद साधताना गेल्या पाच वर्षांत सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. येणाऱ्या काळातही सेवा करण्याची संधी द्याल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.