यंदा पण कोथरूडकर मला सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून देतील’; चंद्रकांत यांनी व्यक्त केला विश्वास
पुणे : महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून काल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ‘चंद्रकांत पाटील’ यांनी कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो कोथरूडकरांनी काल पुण्याच्या रत्यावर अलोट गर्दी केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, भाजपा नेते सी.टी.रवीजी यांंच्यासह अनेक महायुतीचे नेते उपस्थित होते. यंदा पण कोथरूडकर मला मोठ्या मताधिक्क्याने निवडून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार म्हणून मी कोथरूडकरांची पाच वर्षं सेवा करू शकलो. माझ्यावरील प्रेमाची जणू ही पावतीच होती. ही गर्दी, हे प्रेम पाहून मीसुद्धा भारावून गेलो होतो. गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतुकीची समस्याही झाली. त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त करतो. रॅलीला गर्दी करणाऱ्या माझ्या कोथरूडकरांचे मनापासून आभार मानतो. हे प्रेम असेच कायम राहील याची खात्री आहेच. ही गर्दी म्हणजे जणू महायुतीच्या कोथरूडमधील विजयाचा शंखनादच होता. अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरूडकरांनी मोठ्या मताधिक्क्याने मला निवडून दिले होतेच, पण यंदा सर्वाधिक मतांनी कोथरूडकर मला जिंकून देतील, असा विश्वास देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. एका बाजूला चंद्रकांत पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज देखील केला आहे. मात्र महाविकास आघाडीचा अद्यापही उमेदवार ठरलेला नाही. तर मनसेकडून किशोर शिंदे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.