मुळशीकरांची वज्रमूठ महायुतीच्या पाठिशी… ज्या पक्षाने मला मोठं केलं; त्या पक्षाला मोठं करा!- मुरलीधर मोहोळ

8

मुळशी करांनी ठरवलंय आणि ते खरं झालं नाही असं कधीही झालं नाही. भारतीय जनता पक्षाने तुमच्यातल्या एका मुलाला संधी देऊन मोठं केलंय. त्यामुळे पक्षालाही आता मोठं करावं, असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज केले. तसेच, चंद्रकांतदादा पाटील यांनी पालकमंत्री आणि मंत्री म्हणून आतापर्यंत आपल्या तालुक्यातील विकासकामांना ५३५ कोटीचा भरीव निधी दिला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

भोर-मुळशी- मावळ तालुक्याचा मेळावा कोथरूडमधील आशिष गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप महायुतीचे कोथरूडचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील, खडकवासल्याचे भीमराव तापकीर, भोर मुळशीचे शंकर मांडेकर, बाबासाहेब कंधारे, अंकुश मोरे, माऊली साठे, धैर्यशील ढमाले, डॉ. संदीप बुटाला, गोविंद आंग्रे, सुशील मेंगडे, गणेश वर्पे, अजय मारणे, नितीन शिंदे, निलेश शिंदे, सौ. मोनिका मोहोळ, अल्पना वर्पे यांच्या सह मुळशी तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की,‌ मुळशी करांनी ठरवलंय आणि ते खरं झालं नाही असं कधीही झालं नाही. २०१७ ची निवडणुकीत मुळशीकरांच्या निश्चयावर मी नगरसेवक होऊन राजकीय प्रवास सुरू झालो‌. आज तुमचा मुळशीकर माननीय नरेंद्र मोदीजींसोबत काम करतोय‌. तुमचा माणूस मोठा होतोय. हे सर्व भारतीय जनता पक्षाने घडवलंय. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मोठं केलं पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, चंद्रकांतदादा महायुती सरकार मध्ये अडीच वर्षे मंत्री आहेत. या अडीच वर्षाच्या काळात आपल्या तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आणि सरपंच मुळशीच्या कामासाठी दादांना भेटत होते. त्या प्रत्येकाची कामे दादांनी करुन दिली आहेत. मागच्या काळातही सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून ३८८ कोटींची रस्त्याची कामं मुळशीत झाली‌. त्याआधी ६३ कोटी, आणि आता अडीच वर्षात ८४ कोटींची विकासकामे केली. त्यामुळे मुळशीच्या विकासासाठी दादांनी खूप योगदान दिले आहे.

ते पुढे म्हणाले की, शरद ढमाले यांच्यानंतर शंकर मांडेकर यांच्या रुपाने १५ वर्षांनंतर तालुक्याला नेतृत्व मिळालं आहे. त्यामुळे मुळशीकरांनी विचारांनी एकत्र आलं पाहिजे. उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा दिवस संपल्यानंतर महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचं आम्ही ठरवलं आहे. शंकरभाऊंचा शून्यातून प्रवास सुरू झालाय. त्यामुळे आता आलेली संधी कोणीही सोडू नये. ज्यांचं कोथरुड आणि खडकवासला अशा शहरी भागात मतदान आहे, त्यांनी शहरात मतदान करावे. तर ज्यांचं ग्रामीण भागात मतदान आहे; त्यांनी जास्तीत जास्त मतदान करुन महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोथरुड आणि भोर विधानसभा मतदारसंघावर मुळशीकरांचा प्रचंड प्रभाव आहे. २०१९ मध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून आयोजित मेळाव्याची मदत झाली. त्या मेळाव्यात मी म्हटलं होतं. त्यानुसार तशी स्थिती आणण्यात देवेंद्रजी फडणवीस आणि मला संधी मिळाली. पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार काम करण्याचा प्रघात आहे.‌ अडीच वर्षापैकी एक वर्षे मला पुण्याचं पालकमंत्री पद मिळालं. तेव्हा मुळशीचा जो ही व्यक्ती काम घेऊन आल्यावर, ती पूर्ण केली.

पाटील पुढे म्हणाले की, सध्या मी व्यक्ती विकासावर भर दिलाय. झाल उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल कुटुंबांना मदत केली. त्यासोबतच अनेक मुलींना शिक्षणासाठी मदत करतो आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार हे नक्की आहे. हरियाणा मध्ये मतांचा टक्का वाढल्याने एनडीएचं सरकार आलं. हे सर्वेक्षणाच्या पकडीत येत नाही. त्यामुळे मताचा टक्का वाढवला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.‌

यावेळी खडकवासला मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर आणि भोर मुळशीचे महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी आपल्या मनोगतात जास्तीत जास्त मतदान करुन महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले.‌

Get real time updates directly on you device, subscribe now.