दिव्यांगांसाठी ई-वाहन खरेदीचा निविदा रद्द करा, माजी उपमहापौर तुषार हिंगे यांची मागणी

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागांतर्गत शहरातील अपंग व्यक्तींसाठी तीनचाकी ई- वाहन खरेदी प्रक्रिया केली जात आहे. निविदेच्या अटी -शर्तींवरून ठराविक ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवण्यात आल्याचे मत माजी उप महापौर तुषार हिंगे यांनी व्यक्त केले आहे. तसेच हि निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करावी आणि नव्याने राबवावी अशी मागणी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना तुषार हिंगे यांनी पत्राद्वारे केली आहे.
तीनचाकी ई- वाहन खरेदी प्रक्रियेमध्ये एकाच पुरवठादारास समोर ठेवून त्याबाबतचे अटी नियम ठेवण्यात आल्याचा प्राथमिक संशय तुषार हिंगे यांनी व्यक्त केला आहे. तसेच या निवेदेमध्ये अनेक केंद्रीय शासकीय धोरणांना देखील दुर्लक्षित केले आहे. मेक इन इंडिया व स्टार्टअप इंडिया या धोरणाकडे देखील दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे या पत्रामध्ये हिंगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे भारतीय उत्पदकांवर अन्याय होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सार्वजनिक खरेदी धोरणाचे उल्लंघन यामधून होत आहे. एआरएआय प्रमाणपत्राची स्पष्टता नाही. दिव्यांगांसाठी डिझाईन केलेल्या वाहनांसाठी एआरएआय सर्व उत्पादकांकडे उपलब्ध नसते. ते मर्यादित विक्रेत्यांना फायदा देण्याचा उद्देश दिसतो. यासाठी पर्यायी प्रमाणपत्राचा विचार देखील या निवेदित झालेला नाही असा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे. यासोबतच प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केवळ १० दिवसाची मुदत देण्यात आली आहे जी पुरेशी नाही.
एकूणच या निविदेतील अटी – शर्ती पाहता एकाच वितरकाला सोयीस्कर रचना यामध्ये करण्यात आली असल्याचे म्हणत या प्रक्रियेला तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी तुषार हिंगे यांनी केली आहे. सूचनांचा विचार करून स्थानिक उद्योगाला चालना , युवकांना रोजगार मिळेल व अपंग बांधवाना लहान व्यवसायासाठी ते वाहन योग्य अशा वाहनाच्या खरेदीची पुनर्प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात यावी अशी मागणी तुषार हिंगे यांनी केली आहे.