सब ज्यूनियर ॲन्ड कॅडेट्स राष्ट्रीय ज्यूडो चॅम्पियनशिप २०२४-२५ स्पर्धेचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

पुणे : महाराष्ट्र ज्यूडो असोसिएशन आणि ज्यूडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित सब ज्यूनियर ॲन्ड कॅडेट्स राष्ट्रीय ज्यूडो चॅम्पियनशिप २०२४-२५ स्पर्धेचे उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित राहत पाटील यांनी खेळाडूंचा उत्साह वाढविला. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीचे अनावरण केले.
तब्बल दोन दशकानंतर ही स्पर्धा पुण्यात होत असून, या स्पर्धेत जवळपास ३० राज्यातून एकूण १२०० पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले आहेत. यावेळी आपले मत व्यक्त करताना पाटील म्हणाले, या स्पर्धेच्या निमित्ताने मुक्ताताई टिळक यांचे स्मरण केले. स्वर्गीय मुक्ताताई अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आणि खेळाडुंच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहत होत्या. पंतप्रधान माननीय मोदीजींनी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी “खेलो इंडिया”ला चालना दिली. महाराष्ट्र सरकारनेही खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करुन पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडुंना सरळ शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडुंनी चमकदार कामगिरी करुन देशाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन या वेळी पाटील यांनी केले. असोसिएशनने पुढाकार घेतला; तर ज्युडोसाठी क्रीडा संकुल उभारण्याकरिता प्रयत्न करु, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
यावेळी पुनीत बालन, शैलेश टिळक, श्रीमती मनिषा मल्होत्रा, धनंजय भोसले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.