पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्या स्मरणार्थ ‘गंगाधर स्वरोत्सव या महोत्सव म्हणजे एका अद्भुत आत्मिक आनंदाची अनुभूती – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्या स्मरणार्थ ‘गंगाधर स्वरोत्सव या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवाचे यंदाचे १० वे वर्ष असून याआधी अनेक दिग्गज कलाकारांनी या व्यासपीठावर आपली कला सादर केली आहे. या उत्सवात पंडित शौनक अभिषेकी यांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले. या सांगीतिक कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी हजेरी लावली.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. इथे वेगवेगळ्या महोत्सवाच्या माध्यमातून संस्कृती संवर्धनासाठी नेहमीच प्रयत्न होत असतात. त्याला दर्दी रसिकांची ही नेहमीच साथ मिळते. त्यामुळे देश विदेशातील अनेक कलाकार इथे आपली कला सादर करण्यासाठी आतुरलेले असतात. सवाई गंधर्व, वसंतोत्सव हे असे महोत्सव आहेत, ज्यामध्ये केवळ कलाकारच नव्हे; तर देशविदेशातील अनेक रसिक श्रोते मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. यातील आणखी एक पुष्प म्हणजे पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्या स्मरणार्थ ‘स्वरनिनाद’तर्फे आयोजित ‘गंगाधर स्वरोत्सव”! संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार या महोत्सवात आपले पुष्प गुंफताना उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करतात.
यावेळी पंडित शौनक अभिषेकी यांनी सुरंजन मैफलीने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांना ज्ञानदा पुरस्काराने येथे सन्मानित करण्यात आले. पं. सुरेश तळवलकर यांना यापूर्वी केंद्र सरकारने पद्मश्री, करवीर पीठाने ‘तालयोगी’, श्री विष्णू महाराज पारनेरकर यांनी ‘संगीत पूर्णाचार्य’ तसेच संगीत नाटक अकादमीने ‘श्रेष्ठ कालाचार्य’ या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. हा कार्यक्रम म्हणजे एका अद्भुत आत्मिक आनंदाची अनुभूती घेतल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.