जिल्ह्यात आवश्यक असणारी विकासात्मक कामे करण्यासाठी शासन व सी.एस.आर.मधून आवश्यक निधी उपलब्ध करून देणार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

सांगली : आज सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण व अनु.जाती उपयोजना) संबंधी जिल्हा परिषदस्तर व राज्यस्तर कार्यान्वयन यंत्रणांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. पालकमंत्री या नात्याने पार पडलेल्या या बैठकीत जिल्ह्याच्या सर्वंकष विकासाच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
दरम्यान राज्य, जिल्हा परिषद व महापालिका, नगरपालिका स्तरावरील कार्यन्वयीन यंत्रणांचा तपशीलवार आढावा घेताना सन 2023-24 ची संपूर्ण विकास कामे मार्च 2025 पूर्वी पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना पाटील यांनी केल्या. त्याचवेळी चालू सन 2024-25 या वर्षातील राज्य व स्थानिक यंत्रणांनी उर्वरित सर्व प्रशासकीय मान्यता 15 दिवसात पूर्ण करतानाच राज्य यंत्रणांनी 31 मार्च 2025 पूर्वी त्यांचा संपूर्ण खर्च होईल याची दक्षता घ्यावी, अनुसूचित जाती उपयोजना 2024-25 च्या प्रशासकीय मान्यता अत्यल्प असून, सर्व प्रशासकीय मान्यता 15 दिवसात होतील, यासाठी गांभीर्याने कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच, जिल्ह्यात आवश्यक असणारी विकासात्मक कामे करण्यासाठी शासन व सी.एस.आर.मधून आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात विविध ठिकाणी दौरे, बैठका, कार्यक्रमाच्यावेळी हार, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जातो. परंतु, सामाजिक बाब लक्षात घेता हार, पुष्पगुच्छ स्वीकारणार नसल्याने ते कोणीही सत्कारासाठी आणू नयेत. तसेच कार्यक्रमस्थळी फटाके फोडून प्रदूषण करू नये, असे आवाहन यावेळी केले.
या बैठकीस जिल्ह्याच्या पालक सचिव विनिता वेद सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.