मतदारसंघातील अनियमित पाणी पुरवठ्याबाबत कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, नियमित पाणीपुरवठा करा – चंद्रकांत पाटील

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोथरुड विधानसभा मतदारसंघातील पाणी पुरवठ्यासंदर्भात महापालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी, व्हॉलमन आणि नागरिक अशी संयुक्त बैठक अंबर हॉल येथे पार पडली.
चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघातील अनियमित पाणी पुरवठ्याबाबत कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, नियमित पाणीपुरवठा करा, अशा सक्त सूचना या वेळी दिल्या. यावेळी प्रभाग क्रमांक ९ मध्ये होणारी कुत्रीम पाणी टंचाई कशी रोखता येईल, लिकेज कसे थांबवता येतील याबाबत चर्चा झाली, व्हॉल मन बाबत असलेल्या तक्रारी बाबत व पाणी टंचाई बाबत विचारणा करून पाटील यांनी काही सूचना केल्या.
बाणेर बालेवाडी मध्ये चंद्रकांतदादांनी वारंवार पाठपुरावा करून २४×७ हि योजना पूर्ण करून घेतली तसेच काही टाक्यांची कामे पूर्ण करून घेतली व त्या द्वारे पाणीपुरवठा सुरु झाला. काही ठिकाणी अडथळा येत असलेल्या पाईप लाईनचे काम पूर्ण करून घेतले आणि टाक्यांचे योग्य नियोजन लावून संपूर्ण परिसराला पाणी कसे पुरेल कुठल्या टाकीतून कुठल्या भागला पाणी देता येईल असे केलेल्या नियोजनाचा आज आढावा घेण्यात आला.
या वेळी पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, कार्यकारी अभियंता शंकर कोडूसकर, कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे विजय नायकल, वारजे-कर्वेनगरचे दीपक राऊत, औंध-बाणेरचे गिरीश दापकेकर, भाजपा कोथरुड दक्षिण अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर यांच्यासह सर्व माजी नगरसेवक तथा पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, व्हॉलमन उपस्थित होते.