चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, कोथरूड मधील भूसंपादन मोजणी पत्र पुणे महापालिकेला सुपूर्द

पुणे : कोथरुड विधानसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविणे आणि मतदारसंघातील मिसिंग लिंक पूर्ण करण्याबाबत दोन दिवसांपूर्वी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेऊन, येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला होता. त्यावर तात्काळ कारवाई करत उपअधिक्षक भूमी अभिलेख हवेली यांनी मोजणी पत्र उपायुक्त भूसंपादन पुणे महापालिका यांना सुपूर्द केले आहे. यासाठी पाटील यांनी उपअधिक्षक भूमीअभीलेख अमरसिंह पाटील यांचे अभिनंदन केले.
चंद्रकांत पाटील यांनी आयुक्तांसोबत घेतलेल्या बैठकीत भूसंपादनाच्या अनुषंगाने कोथरूड मधील सर्वे नंबर ६८, ७६, ७८ आणि ७९ चे भूसंपादन मोजणी पत्र उपअधिक्षक भूमीअभीलेख यांच्याकडे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असून, सदर भागातील भूसंपादन रखडले होते. त्यामुळे मिसिंग लिंक पूर्ण करता येत नसल्याची बाब पुणे महापालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी बैठकीतूनच संबंधित उपअधिक्षक भूमी अभिलेख हवेली यांना सदरचे मोजणी पत्र तात्काळ देण्याबाबत निर्देश दिले होते. चंद्रकांत पाटील मागील काही दिवसांपासून मिसिंग लिंक संदर्भात बैठक घेत आहेत. नुकतीच उपमुख्यमंत्री तथा पुणे महापालिका जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन मिसिंग लिंकसाठी आवश्यक निधी देण्यासंदर्भात निवेदन देखील दिले आहे.
याप्रकरणी तात्काळ कारवाई करत उपअधिक्षक भूमीअभीलेख अमरसिंह पाटील यांनी मोजणी पत्र उपायुक्त भूसंपादन पुणे महापालिका यांना सुपूर्द केले. यासाठी अमरसिंह पाटील यांच्या कार्यतत्परतेचे चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले. या कार्यवाहीमुळे सदर विकास आराखड्यातील मिसिंग लिंकचे काम सुरू करण्यास गती मिळेल, असा विश्वास वाटत असल्याचे देखील पाटील यांनी म्हटले.