समाजाची गरज ओळखून विविध उपक्रम राबवावेत – चंद्रकांत पाटील

पुणे : हिंदू संस्कृतीत विशेष महत्व असलेला पवित्र असा महा कुंभमेळा प्रयागराज येथे संपन्न होत आहे. यानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक, हनुमान मंडळ आणि नरेंद्र मोदी विचार मंचाचे सदस्य सकारात्मक ऊर्जा घेऊन या महा कुंभमेळ्यात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत यांनी या सर्व सेवकांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मंडळाच्या सर्व सभासदांशी संवाद साधत मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. दरम्यान, समाजाची गरज ओळखून विविध उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. तसेच, विद्यापीठामध्ये चालणाऱ्या ‘कमवा आणि शिका’ या उपक्रमावर अधिकाधिक भर देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच आर्थिक नियोजनाची सवय लावली पाहिजे, अशी भावनाही पाटील यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, प्र-कुलगुरु डॉ.पराग काळकर हे देखील उपस्थित होते. यावेळी कुटुंब प्रबोधन गतिविधीच्या ‘नव’ गुण संपन्न परिवार या कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशनही केले.