अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने कायद्याचा धाक निर्माण करावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

100

सांगली : सांगली जिल्ह्यात वारंवार आमली पदार्थांचे साठे मिळत असल्याने ‘आमली पदार्थ मुक्त सांगली’ करण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्याची आमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना समिती (टास्क फोर्स) स्थापना करण्यात आली आहे. या समितीची बैठक आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी आणि अमली पदार्थांची लागवड, वाहतूक, विक्री, तस्करी करणाऱ्यांची कसलीही गय करू नये, तसेच टास्क फोर्सने अमली पदार्थ विरोधी कायद्याचा धाक निर्माण करावा, असे निर्देश पाटील यांनी दिले.

अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना समिती (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आली असून, या टास्क फोर्समध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक, एम. आय. डी. सी. च्या प्रादेशिक अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक आयुक्त, औषध विभाग हे सदस्य आहेत. या टास्क फोर्सच्या कामगिरीचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील दर आठवड्याला आढावा घेणार आहेत. यावेळी मागील आठवड्यात केलेली कामगिरी, पुढील आठवड्यातील नियोजन करण्यात येईल. प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणी व आव्हाने याचा आढावा घेतला जाणार आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, अमली पदार्थांच्या दुष्परिणामसंदर्भात सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करावी. त्यासाठी अमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगणारी लघुचित्रफीत तयार करावी. शाळा महाविद्यालयातील मुले, युवकांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम समजून सांगावेत, जेणेकरून भावी पिढी यापासून दूर राहू शकेल. आगामी कालावधीत आपण वैयक्तिकरीत्या शाळा महाविद्यालयांना भेट देऊ, असे ते म्हणाले.

अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी टास्क फोर्सने स्वतःचा आराखडा तयार ठेवावा. नागरिकांना विश्वास द्यावा, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील 134 बंद कारखाने तपासणी मोहिमेसाठी जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित करावेत. टास्क फोर्सने ही तपासणी मोहीम जलद गतीने पूर्ण करावी. ज्यांचा अशा अमली पदार्थ कारवायांमध्ये सहभाग नाही, त्यांना कदाचित त्रास होईल. मात्र, अशा कारखानदारांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले.

पोलिस दलाने गस्त वाढवावी. गोपनीय खबर मिळण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. अमली पदार्थ विरोधी कारवाई केल्यानंतर अशा खटल्यात कोणतीही त्रृटी ठेवू नका. अमली पदार्थ तस्करांना कडक शिक्षा होण्यासाठी जास्तीत जास्त पुरावे गोळा करा. त्याचबरोबर माहिती देणाऱ्यांना सुरक्षा द्यावी, असे निर्देश पाटील यांनी दिले.

अमली पदार्थ दुष्परिणामाबाबत प्रबोधन व जनजागृती करणाऱ्या संस्थांनी पुढाकार घेण्याबाबत पुनरूच्चार करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी सर्वच माध्यमात अमली पदार्थ दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करून याबाबत जनजागृती करावी. त्यासाठी मानधन दिले जाईल़, असे त्यांनी सांगितले.

या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (M.I.D.C.) च्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.