कोथरूड मधील नागरिकांनी आपापल्या भागातील मिसिंग लिंक पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

पुणे : कोथरुड मतदारसंघातील एरंडवणे भागातील १२ सोसायटींनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या संकुल संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत नागरी समस्यांसंदर्भातची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी पार पडली. यावेळी कोथरूडमधील एसआरए प्रकल्पातील व्यवसायिक दुकांनामुळे होणारी वाहतूक कोंडी; यांसह कचरा, नालेसफाई, आदी समस्या मांडल्या. या समस्या सोडविण्यामधील प्रशासनाला येणाऱ्या अडचणी पाटील यांनी समजून घेतल्या.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारकडून १५० कोटी निधी मिळणार असून; उर्वरित निधी महापालिकेच्या माध्यमातून खर्च करुन मिसिंग लिंक तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोथरूड मधील नागरिकांनीही आपापल्या भागातील मिसिंग लिंक पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
कोथरुड मध्ये मोठ्या प्रमाणात पुनर्विकास प्रकल्प सुरु असून; नवीन गृहप्रकल्प उभे राहत आहेत. त्यामुळे कोथरूड मधील नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. ही बाबत लक्षात घेऊन भागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याची ग्वाही देखील पाटील यांनी यावेळी दिली.
या बैठकीस महापालिकेचे वारजे क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभाग अधिकारी राजेश गुर्रम, क्षेत्रीय अधिकारी दीपक राऊत, कोथरुड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, भाजपा सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरुड दक्षिण अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, माजी नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे, मा. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, ॲड. मिताली सावळेकर, प्रभाग १३ च्या अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे यांच्या सह १२ सोसायटीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.