करजगी बालिका अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

116

सांगली : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली दौऱ्यादरम्यान जत तालुक्यातील करजगी येथे पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला. जत तालुक्यातील करजगी येथे बालिका अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्याचा निकाल लवकरात लवकर होवून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले.

चंद्रकांत पाटील या घटनेची सविस्तर माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून व कुटुंबियांकडून जाणून घेतली . यावर मत व्यक्त करताना पाटील म्हणाले, करजगी येथील बालिका अत्याचार व हत्येची घटना अत्यंत दुर्देवी व माणुसकीला काळिमा फासणारी आहे. यामध्ये पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली. याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल करून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच, मनोधैर्य योजनेतून पीडितेच्या कुटुंबियांना सत्वर आर्थिक मदत देण्यात येईल. याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधिक्षक संदीप घुगे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.