एमआयडीसी क्षेत्रातील रस्ते कामांचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा नियोजन मधून कामे करण्यासाठी प्रयत्न करू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर यांच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग व व्यापार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेस उद्योग मंत्री उदय सामंत आणि उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, एमआयडीसी क्षेत्रातील रस्ते कामांचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा नियोजन मधून कामे करण्यासाठी प्रयत्न करू. उद्योजकांना कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची आवश्यकता असते. नवनवीन उपक्रम, शोधामुळे जग श्रीमंत झाले. त्यामुळे आपल्यालाही त्या दिशेने जावयाचे आहे. उद्योजकांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहोत. संशोधनासाठी प्रयत्न करीत आहोत. प्रत्येक जिल्ह्यातील उद्योग जगत व प्रामुख्याने पॉलिटेक्निक इंजिनिअरींग यांनी परस्पर समन्वयाने बैठक घेऊन आवश्यक मनुष्यबळ विकसीत करण्यासाठी अभ्यासक्रम विकसीत करावेत, असे ते म्हणाले.
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, हळदीनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीत वसमत येथील हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र करण्यासाठी लवकरच बैठक घेऊ. तसेच संरक्षण सामग्री उद्योग प्रकल्पही सांगलीत आणण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.एमआयडीसी क्षेत्रातील अत्यावश्यक सुविधांसाठी एमआयडीसी विभाग, महानगरपालिका व शक्य झाले तर जिल्हा नियोजन समितीमधून आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल. कवलापूर विमानतळाच्या बाबतीत निकषांचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल. या अनुषंगाने महाराष्ट्र विमान प्राधिकरणाचा अहवाल आल्यानंतर उचित निर्णय घेण्यात येईल. सांगली जिल्ह्यातील ड्रायपोर्टचा प्रश्न सकारात्मक पध्दतीने सोडवू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी माजी मंत्री व आमदार जयंत पाटील, जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंड. अँड अग्रीचे अध्यक्ष ललित गांधी, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ सूत्रधारी कंपनी मर्या. च्या संचालिका नीता केळकर, दीपक शिंदे, रवींद्र माणगावे, रमाकांत मालू आदि मान्यवर व उद्योजक उपस्थित होते.