उद्योग क्षेत्रात प्रगती करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी समाजाची गरज ओळखून संशोधन करावे, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

पुणे : विद्यार्थ्यांमध्ये संशोधन आणि उद्यमशीलता वाढविण्यासाठी आणि स्टार्टअप क्षेत्रातील नवनवीन संधींची ओळख व्हावी, यासाठी डी.वाय.पाटील विद्यापीठ आणि जेफॉरई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिनर्जी समिट २०२५’ या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आज या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, आज आपला देश वेगाने प्रगती करत आहे. संशोधनाचे महत्त्व ओळखून आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी स्टार्ट अप्स आणि मेक इन इंडियाला चालना दिली. नवीन शैक्षणिक धोरणातही याचा अंतर्भाव केला आहे. आज स्टार्ट अपमुळे संरक्षण क्षेत्रात आपण स्वावलंबी झालो आहोत. त्यामुळे उद्योग क्षेत्रात प्रगती करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी समाजाची गरज ओळखून संशोधन करावे, असे आवाहन याप्रसंगी केले. तसेच, उद्योजकांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक कर्तव्य ओळखून दातृत्व वाढवले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी देखील माहिती दिली.
या परिषदेस विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.डी.पाटील, एन जे पवार, संजय पवार, स्मिता जाधव, भाजपा उद्योग आघाडीच्या पुणे शहर अध्यक्षा अमृता देगावकर, जे फॉर ईचे विशाल मेठी यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.