नशा, ड्रग्स या विषयामध्ये प्रशासनाची खूपच कठोर भूमिका, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

सांगली, १७ फेब्रुवारी : सांगली जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सची दुसरी बैठक आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत आजपर्यंत झालेल्या कारवाईचा सविस्तर आढावा टास्क फोर्समधील सर्व अधिकाऱ्यांकडून यावेळी पाटील यांनी घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, औषध प्रशासन विभागाच्या सह आयुक्त आर. एस. कारंडे, उप प्रादेशिक अधिकारी व्ही. व्ही. किल्लेदार, पोलीस निरीक्षक ए. एस. काळे यांच्यासह टास्क फोर्सचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीबाबत माहिती देताना पाटील म्हणाले, पोलीस अधिकारी , MIDC चे अधिकारी यांची दर सोमवारी आम्ही एक बैठक घेत आहोत. आजही बैठक झाली आढावा घेतला. शाळांच्या जवळ काही टपऱ्यांवर इंजेक्शन मिळत आहेत जे नाशिले आहेत. एका टपरीवर अशा प्रकारचे इंजेक्शन पकडण्यात आले आहे. त्या टपरीच लायसन्स काढून घेण्यापर्यंत लायसन्स बडतर्फ करण्यापर्यंत आम्ही कारवाई करू, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.
नशा, ड्रग्स या विषयामध्ये प्रशासन खूपच कठोर भूमिका घेत असल्याचे देखील पाटील म्हणाले. यासाठी आम्ही बक्षीस घोषित केलं आहे. माझ्या स्वतःच्या वतीने दर आठवड्याला जे जे अधिकारी यामध्ये चांगलं काम करत आहेत, त्यांना १०,००० रुपये देणार आहे. यासोबतच एक चांगली फिल्म बनवण्याचा प्रयन्त करत आहे जी प्रबोधनात्मक असेल. शाळांच्या २०० मीटर परिसरामध्ये तंबाखू विकता येत नाही. या टपऱ्या जर नगरपालिकेने उडवल्या नाहीत तर आम्हालाच कारवाई करावी लागेल. जून पर्यंत शाळे पासून २०० मीटर परिसरामध्ये जी टपरी तंबाखू किंवा अन्य नशेचे पदार्थ विकत असेल, ती टपरी राहणार नाही अशी आम्ही कारवाई करू, असे पाटील यांनी सांगितले.
विटा पत्रकार मारहाण प्रकरण :
विट्याला पत्रकाराला झालेली मारहाण हा विषय आम्ही खूप गांभीर्याने घेतला आहे. सहा आरोपी अटक झाले पाहिजेत. त्यातील चार आरोपीना अटक करण्यात यश आले आहे. एमपीडीए लावण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण सुरु आहे, अशी माहिती यावेळी पाटील यांनी दिली.