आंबेगाव येथील ‘शिवसृष्टी’च्या द्वितीय चरणाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

पुणे : पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या द्वितीय चरणाचे लोकार्पण आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ, तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसरा टप्पा देखील शिवकाळाशी समरस होणारा आहे. माननीय केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सुचविलेल्या आणि शिवछत्रपतींच्या संपूर्ण जीवनाचा सार असलेल्या स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाव या त्रिसूत्रींचा दुसऱ्या टप्प्याच्या उभारणीत समावेश करण्यात आल्याने, शिवसृष्टीला एक वेगळेपण प्राप्त झाले आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसृष्टीचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. स्वर्गीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पतनेतून साकार झालेली शिवसृष्टीच्या लोकार्पणाची संधी मिळाली आणि संध्याकाळी आग्र्याला चाललो. ज्याठिकाणी शिवाजी महाराजांना बंदिस्त करण्याचा मूर्खासारखा प्रयत्न करण्यात आला. मला असं वाटतं की आजचा दिवस माझ्याकरिता अत्यंत धन्य अशा प्रकारचा दिवस आहे. मला या शिवसृष्टीचे एका शब्दात वर्णन करताना सांगितलं तर मी नि:शब्द आहे. इतकं सुंदर कार्य याठिकाणी झालेलं आहे. तुळजाभवानी मातेचं मंदिर, त्याची भव्यता जशी साकारली आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचे काम याठिकाणी झाले आहे. याठिकाणी स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषेचे जे दालन तयार केलेले आहे. मी जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी गेलो. थ्री डी फोरडी, 16 डीसुद्धा बघितलं. मात्र जी प्रेरणा आणि भावना या थिएटरमध्ये तयार झाली, ती अववर्णीय आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी कौतुक केले.
महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून साकारली जात असलेली ही शिवसृष्टी केवळ पर्यटन केंद्रच नाही, तर पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचे आणि संस्काराचे एक केंद्र ठरणार आहे. यातील पुढील टप्पे लवकरात लवकर पूर्ण व्हावेत, या दृष्टीने शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्याच्या उभारणीसाठी राज्य सरकारतर्फे ५० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा यावेळी फडणवीस यांनी केली.
शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याच्या निर्मितीमध्ये सुमारे रुपये ८७ कोटींचा विनियोग करण्यात आला असून स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा ही शिवाजी महाराजांना जवळची असणारी महत्वाची ३ तत्वे यावर या टप्प्याच्या निर्मितीमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यातील गंगासागर तलावात रायगड, राजगड, प्रतापगड, सिंहगड या किल्ल्यावरून आणलेले पाणी अर्पण करण्यात आले. याशिवाय उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री मा.श्री. योगी आदित्यनाथ जी यांनी प्रयागराज येथून पाठविलेल्या पाण्याचा कलश, तुळापूर त्रिवेणी संगमांवरील पाणी आणि नर्मदा नदीचे पाणी देखील यावेळी गंगासागरता अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाला, मंत्री ॲड. आशिषजी शेलार, खासदार मेधाताई कुलकर्णी, आ. विजयबापू शिवतारे, रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, पुणे महानगर संघचालक रवींद्रजी वंजारवाडकर, शिवसृष्टीचे जगदीश कदम, अमृत पुरंदरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.