छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात ‘जय शिवाजी-जय भारत’ पदयात्रेचे आयोजन… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पदयात्रेत सहभाग

पुणे : हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कामगार तथा रोजगार आणि युवा व्यवहार व क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडवियजी यांच्या उपस्थितीत “जय शिवाजी, जय भारत” पदयात्रा काढण्यात आली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची देखील उपस्थिती होती.
राष्ट्रभावना, सामाजिक सलोखा, युवांच्या संकल्पना जाणून घेणे, तसेच कला, संस्कृती व परंपरा जतन करणे, स्वच्छता, पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण करणे, राष्ट्र निर्माणात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचे आदर्श तरुण पिढीपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने ही यात्रा संपूर्ण देशात आयोजित करण्यात आली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून हिंदवी स्वराज्य संस्थापक वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘जय शिवाजी-जय भारत’ या पदयात्रेचे आयोजन अतिशय सुंदर पद्धतीने करण्यात आले.
आजच्या पुण्यातील पदयात्रेत केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रिय मंत्री रक्षाताई खडसे, राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार मेधाताई कुलकर्णी ,आमदार सिद्धार्थदादा शिरोळे, आमदार हेमंत रासने आणि जवळपास २० हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते. या पदयात्रेमुळे संपूर्ण पुणे शहर आज शिवमय झाले होते.