मुंबई विद्यापीठाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

65

मुंबई : मुंबई विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवशौर्यगाथा पोवाडा गायन स्पर्धेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. विद्यापीठाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे पाटील यांनी यावेळी आश्वासन दिले.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. त्यांचे कर्तृत्व केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून, संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य लोकशाही, न्याय, समता, प्रशासनाची आदर्श संकल्पना तसेच त्यांचे शौर्य आणि कार्याची गाथा येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. त्याकरिता विद्यापीठाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे पाटील यांनी आश्वस्त केले.

शिवजयंती निमित्त महाराजांच्या विचारांचा जागर घडविण्यासाठी विविध उपक्रम सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत शिवचरित्र जागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठानेही या उपक्रमात सहभाग घेतला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिवरायांचे पराक्रम, शौर्य, आणि प्रशासन कौशल्य यांचे दर्शन घडवले.

उद्घाटन समारंभास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अजय भामरे, प्रा. डॉ. बळीराम गायकवाड, कुलसचिव डॉ. प्रशांत कारंडे आणि विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.