संविधान जगण्याची चौकट आणि समानतेचे प्रतीक – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

19

मुंबई : मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र आणि श्री. बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “संविधान अमृत महोत्सव… हमारा संविधान, हमारा अभिमान” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. नव्या पिढीला सामाजिक न्याय, मुक्त शिक्षण आणि समानतेच्या मूल्यांची जाणीव व्हावी, या उद्देशाने ‘हमारा संविधान… हमारा अभिमान’ या संकल्पनेतून जनजागृती केली जात असल्याचे पाटील म्हणाले.

या कार्यक्रमासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. विरेंद्र कुमार, केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे सचिव अमित यादव, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्रा. डॉ. अजय भामरे, प्रा. डॉ. बळीराम गायकवाड, कुलसचिव डॉ. प्रशांत कारंडे, प्रा. डॉ. मनिषा कर्णे तसेच विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्याचे मोठे अमूल्य कार्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. संविधान ही जीवन जगण्याची चौकट आहे. भारतीय संविधान बदलले जात असल्याचा चुकीचा प्रचार केला जात आहे. महिलांना विधानसभा व लोकसभेत ३३ टक्के आरक्षण, सर्वाना मोफत शिक्षण, विद्यार्थ्यांना आर्थिक निकषांवर नोकरीत आरक्षण अशा तरतुदी करण्यात आल्या. भारतीय संविधान हा एक जिवंत दस्तऐवज असून तो वाचून समजून घेणे महत्वाचे आहे. आपल्या अधिकार आणि कर्तव्याची जाणीव संविधानामुळे होत असून सामाजिक, आर्थिक जीवन जगण्याचा मार्ग संविधानामुळे मिळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना मतदानाचा समान अधिकार दिला त्याबद्दल आपण सदैव त्यांच्या ऋणात राहू, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रात प्राध्यापक आणि संशोधक पदांना मान्यता दिली जाणार आहे. तसेच कलिना संकुलात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी दोन स्वतंत्र वसतिगृहे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी मुंबई विद्यापीठात केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.