मतदारसंघातील समान पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, तसेच पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

85

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघातील समान पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, तसेच पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीच्या सुरुवातीला पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पुणे आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील कामाबाबतचा सविस्तर तपशील चंद्रकांत पाटील यांच्या समोर मांडला. समान पाणीपुरवठा प्रकल्प अंतर्गत पुणे शहरात १४१ झोन निश्चित केले असून त्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात एकूण १७ झोन आहेत. प्रत्येक झोन मध्ये अस्तित्वातील GSR अथवा प्रस्तावित ESR/ GSR झोनसाठी पाणीपुरवठा प्रस्तावित आहे. अस्तित्वातील वितरण नलिका व आवश्यकतेनुसार नवीन जलवाहिन्या टाकून नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे, असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी पाटील यांना दिली.

पुणे महानगरपालिका यांच्यामध्ये जागेबाबत न्यायालयीन वाद सुरू आहे. त्यामुळे पाण्याचे टाकीचे काम अपूर्ण असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.त्यावर सदर सर्व कामे जलदगतीने पूर्ण करावीत; तसेच आयडियल कॉलनीच्या टाकीचा प्रश्न सामोपचाराने सर्वांना विश्वासात घेऊन मार्गी लावावा, अशा सूचना यावेळी पाटील यांनी दिल्या. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कोथरुड मधील १७ झोन मध्ये २८३९७ इतके AMR मीटर बसविणे प्रस्तावित असून २३२०९ AMR मीटर बसवण्यात आले असून उर्वरित सुमारे ५००० AMR मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. सदर कामामुळे पाण्याच्या गळतीचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी झाले असून २०% पर्यंत कमी करण्यासाठी आवश्यक कामे सुरु आहेत, अशी माहिती ही अधिकाऱ्यांनी पाटील यांना दिली.

पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी पाहता, खडकवासला मधून पाणीपुरवठा होणे शक्य नाही. त्यामुळे पुणेकरांसाठी मुळशी धरणातून पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून; त्यावर लवकरच मार्ग निघेल, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.

या बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, अधिक्षक अभियंता श्रीकांत वायदंडे, प्रसन्नराघव जोशी, कार्यकारी अभियंता विनोद क्षीरसागर, उप अभियंता प्रशांत कदम, कनिष्ठ अभियंता गणेश काकडे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.