केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रात 20 लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी घरकुल मंजुरीचे पत्र; १० लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरीत

12

पुणे : केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या शुभहस्ते प्रधानमंत्री आवास योजना ‘ग्रामीण’ (टप्पा – २) च्या अंतर्गत २० लाख लाभार्थ्यांना स्वीकृती पत्राचे वितरण तसेच १० लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. आज पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आल्यामुळे २० लाख कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या सर्व २० लाख लाभार्थ्यांचे पाटील यांनी अभिनंदन केले. आजचा दिवस राज्यातील जनतेसाठी आनंदाचा म्हणावा लागेल, असेही ते म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत हा आनंदोत्सव संपन्न झाला.

यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ, विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदेजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी जयकुमारजी गोरे, योगेशजी कदम, माधुरीताई मिसाळ , आमदार उमा खापरे, अमित गोरखे, विजय शिवतारे, भीमराव तापकीर, बापुसाहेब पठारे, शंकर मांडेकर, शंकर जगताप, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, ग्राम विकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्राला सर्वात जास्त घरे देण्यात आली आहेत. महाराष्ट्रात 20 लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी घरकुल मंजुरीचे पत्र देण्यात येत आहे. वीस लाख कुटुंबांच्या जीवनात एकाचवेळी आनंद निर्माण करण्याचा हा क्षण अत्यंत दुर्मिळ व ऐतिहासिक आहे, येणारी दिवाळी तुमच्या नवीन घरात सुखा-समाधाने साजरी करा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नाकरीता आपण व आपल्या भावी पिढीने भरीव योगदान द्यावे, असे आवाहन देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.

फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत यापूर्वी १ लाख २० हजार रुपये, नरेगामधून २८ हजार आणि शौचालय बांधकामासाठी १२ हजार रुपये असे एकूण १ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते, आता यामध्ये ५० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; त्यामुळे आता यापुढे लाभार्थ्यांना दोन लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘सर्वांसाठी घरे’हे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामविकास विभागाने एकूण २० लाख घरांच्या मंजुरीचे काम वेळपूर्वी पूर्ण केले आहे. आज रोजी १० लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले असून उर्वरित १० लाख लाभार्थ्यांनाही येत्या १५ दिवसात पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात यावे तसेच घरांचे बांधकाम वेळेत पूर्ण होण्याच्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे नियोजन ग्रामविकास विभागाने करावे, असे फडणवीस म्हणाले.

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या ५ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात मंजुरी पत्राचे वाटप आणि १० लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे कळ दाबून वितरण करण्यात आले. तसेच महाआवास अभियान २०२४-२५ पुस्तिका आणि पोस्टरचे अनावरणही करण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.