वीर सावरकरांच्या ‘अनादि मी अनंत मी अवध्य मी भला’ या गीताला राज्य सरकारतर्फे ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार-२०२५’ जाहीर… चंद्रकांत पाटील यांनी या पुरस्कारासाठी मानले राज्य सरकारचे आभार

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने यावर्षीपासून दिला जाणारा पहिला ‘महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिला रिपु जगति असा कवण जन्मला’ या गीताला देण्यात येत असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आशिषजी शेलार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, स्वातंत्र्यासाठी आपले तन-मन-धन अर्पण करणारे, ज्वलंत हिंदुत्वाचे पुरस्कर्ते, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आत्मार्पण दिन! वीर सावरकर यांनी देशासाठी अमूल्य योगदान दिले आहे. सावरकरांनी रचलेल्या कविता ऐकताना आजही ऊर अभिमानाने भरून येतो. त्यांच्या ‘अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिला रिपु जगति असा कवण जन्मला’ या गीताला राज्य सरकारतर्फे ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार-२०२५’ जाहीर करण्यात आला आहे. याचा मला अभिमान वाटत असल्याचे पाटील यांनी म्हटले.
2 लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराचे हे पहिले वर्ष असून हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार आहे. या स्तुत्य निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन, असे पाटील म्हणाले.
ज्या पध्दतीने महाराष्ट्रभूषण आणि अन्य सन्मानाचे पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येतात. त्याच पद्धतीने दरवर्षी एका प्रेरणा गीताला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज हे एक उत्तम साहित्यिक आणि संस्कृतचे उत्तम जाणकार होते. त्यांनी संस्कृत भाषेत ‘बुधभुषण’ हा ग्रंथ लिहिला होता. तर ‘नायिकाभेद’, ‘नखशीख’ आणि ‘सातसतक’ हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले होते.
या पुरस्कारासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून सांस्कृतिक कार्य विभागाच्या अपर मुख्य सचिवांसह सांस्कृतिक संचनालयाचे संचालक, गोरेगाव चित्रनगरी व्यवस्थापकीय संचालक, उपसचिव सांस्कृतिक कार्य, पु. ल देशपांडे कला अकादमी संचालक, दर्शनिका विभाग संपादक या समितीचे सदस्य आहेत. मंत्री आशिष शेलार हे फ्रान्स दौऱ्यावर असून, याबाबतची आज ऑनलाईन बैठक घेऊन यावर्षीचे प्रेरणा गीत म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या गीताची निवड एकमताने करण्यात आली आहे.