‘स्वारगेट’ बलात्कार प्रकरण : पुण्याच्या संस्कृतीला काळिमा फासणाऱ्यांना आणि असे घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना कठोर शासन करावे, चंद्रकांत पाटील यांच्या पोलीस आयुक्तांना सूचना

पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बलात्काराची घटना घडली. या प्रकरणातील दत्तात्रय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे. या घटनेतील आरोपीच्या शोधासाठी १३ ठिकाणी पथक रवाना करण्यात आले आहे. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील या घटनेचा निषेध करत असे घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना कठोर शासन करावे, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत.
या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, स्वारगेट बस स्थानकातील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपीची ओळख पटली असून, त्याला तात्काळ अटक होईल, असा विश्वास आहे. या घटनेनंतर पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला असून, कठोर कारवाईच्या सूचना दिल्याअसल्याची माहिती पाटील यांनी दिली. पुणे हे सुसंस्कृत शहर असल्याने देशभरातून असंख्य नागरिक इथे येत असतात. त्यामुळे पुण्याच्या संस्कृतीला काळिमा फासणाऱ्यांना आणि असे घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना कठोर शासन करावे, अशा सूचना देखील पाटील यांनी दिल्या.
सराईत गुन्हेगार असलेल्या आरोपीने स्वारगेट येथे उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. बलात्कारानंतर तिला जीवेमारण्याची धमकीही देण्यात आली. दत्तात्रय गाडे,वय ३५, रा. शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे, अशी या आरोपीची माहिती असून तो सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे. स्वारगेट पोलिसांनी १३ पथके तयार केली आहेत. गाडेच्या संपर्कात असलेल्या दहा मित्रांची पोलिसांनी चौकशी पोलिसांनी बुधवारी रात्री केली.ज्या बसमध्ये गाडेने तरुणीवर बलात्कार केला. त्या बसची न्यायवैद्यकीय तज्ज्ञांकडून (फाॅरेन्सिक एक्सपर्ट) तपासणी करण्यात येणार आहे. एसटी बस न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे.