अमली पदार्थ विरोधी जनप्रबोधनासाठी गीत स्पर्धा, 51 हजाराचे बक्षीस – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

12

सांगली,  : जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अमली पदार्थ टास्क फोर्सची चौथी बैठक पार पडली. व्यसनमुक्ती, नशामुक्तीसाठी, अमली पदार्थ विरोधात शाळा महाविद्यालयात प्रबोधन करण्यासाठी गीतस्पर्धा घोषणा करून, त्यासाठी 51 हजाराचे बक्षीस चंद्रकांत पाटील यांनी यावेळी जाहीर केले. तसेच अमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा करण्यासाठी सर्व त्या उपाययोजना करून राज्यात अमली पदार्थविरोधी सांगली जिल्ह्याचे आदर्श मॉडेल तयार करण्यासाठी सर्व माध्यमातून प्रयत्न करावेत, याचा पुनरूच्चार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, गत आठवड्यामध्ये अमली पदार्थ साठे सापडण्याची नवीन घटना आढळली नाही. मात्र, जे साठे सापडले आहेत, त्यावरील कायदेशीर कारवाया गांभीर्याने सुरू आहेत. बंद कारखान्यांची तपासणी सातत्याने सुरू आहे. माध्यमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्रत्येक शाळेत प्रार्थनेच्या आधी अमली पदार्थ विरोधी प्रबोधन उपक्रम सुरू करत असल्याचे सांगून पाटील म्हणाले, अमली पदार्थ विरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये प्रार्थनेनंतर अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा, प्रबोधन गीत व व्यसनाचे दुष्परिणाम सांगणारे व्याख्यान किंवा चित्रफीत असा उपक्रम राबविण्यात येणार आहे, त्या अनुषंगाने प्रार्थनेच्या वेळी अमली पदार्थविरोधी प्रबोधन करण्यासाठी चालीसह तीन मिनिटांपर्यंत गीत सादर करण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करावी. हे गीत अमली पदार्थविरोधी आशयघन, प्रभावी, आकर्षक व नेमके प्रबोधन करणारे असावे. त्यासाठी परीक्षकांची नियुक्ती करावी. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या स्पर्धेची संपूर्ण कार्यवाही पार पाडावी. प्रथम पारितोषिक रक्कम रुपये 51 हजार असावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

अमली पदार्थ घटनेतील दोषींना कठोर शासन व्हावे, कायद्याच्या कचाट्यातून दोषी सुटू नयेत, या अनुषंगाने अशा प्रकरणात चांगले वकील द्यावेत, असे सूचित करून चंद्रकांत पाटील म्हणाले, विद्यार्थी दशेपासूनच अमली पदार्थांचे दुष्परिणाम रुजविण्याची गरज आहे. जेवणाच्या सुटीत विद्यार्थी शाळा कुंपणातून बाहेर जाणार नाहीत, यासाठी शाळांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच महानगरपालिका क्षेत्रातील डार्क स्पॉट्स शोधून काढावेत व त्या ठिकाणी कोणतीही दुष्कृत्ये होणार नाहीत, यासाठी उपाययोजना कराव्यात, असे ते म्हणाले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांसाठी स्थापन टास्क फोर्सने केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच उर्वरित बंद कारखाने तपासणी कालमर्यादेत पूर्ण करावी, असेही त्यांनी यावेळी सूचित केले.

या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम. आय. डी. सी.) च्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यासह टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.