औरंगजेबावर केलेल्या वक्तव्यावरून समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाचा मांडला प्रस्ताव

मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दिवस तिसरा. आज समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलेलं आहे. औरंगजेबावरकेलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आज सभागृहात मांडला.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, आमदार अबू आझमी यांनी विधानभवन परिसरात प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना “औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता” अशा स्वरूपाचे भलामण करणारे व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह, निंदनीय आणि संतापजनक वक्तव्य केले आहे. यासाठी त्यांचा समाजातील सर्व स्तरातून व विविध राजकीय पक्षांकडून निषेध करण्यात येत आहे. अबू आझमी यांनी बेजबाबदार विधान करुन विधानसभा सदस्याला न शोभणारे वर्तन केले आहे. सदर कृत्य विधिमंडळाच्या प्रतिमेस बाधा आणणारे आणि सर्वोच्च सभागृहाचा अवमान करणारे आहे. अबू आझमी यांनी अशोभनीय वर्तन करुन विधान मंडळाची प्रतिमा मलीन केल्याबद्दल त्यांचे सदस्यत्व अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत निलंबित करावे असे चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात म्हटले.
अबू आझमी यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत औरंगजेब हा एक उत्तम प्रशासक असल्याचं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका होत होती. त्यानंतर आज अधिवेशनात चंद्रकांत पाटील यांनी आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर अबू आझमी यांचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलं.