धमन्या गोठवून टाकणाऱ्या शंभूचरित्राचा रोमांचक अनुभव घेतला, “छावा” चित्रपट पाहून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया

74

मुंबई : नरिमन पॉईंट येथील आयनॉक्स थिएटरमध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधिमंडळ सदस्य, मंत्री यांच्यासाठी छावा या चित्रपटाच्या स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापती राम शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुलजी पटेल यांच्या समवेत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती देताना म्हटले कि, धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित “छावा” या चित्रपटाने देशात इतिहास घडवला आहे. स्वराज्य, स्वधर्म आणि स्वाभिमान यांच्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या सर्वोच्च बलिदानाचे प्रत्ययकारी चित्रण पाहून समस्त भारतीयांच्या मनात कालवाकालव झाली आहे. देश आणि धर्मप्रेमाची नवी लाटच या चित्रपटाने आणली आणि हिंदवी स्वराज्याकडे पाहण्याची नवी दृष्टी समस्त भारतीयांना दिली. यावेळी धमन्या गोठवून टाकणाऱ्या शंभूचरित्राचा रोमांचक अनुभव घेतला असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र, शौर्य, वीरता, चातुर्य, अतुलनीय विद्वता जनसामान्यांपर्यंत संपूर्ण देशभर छावा चित्रपटाच्या कलाकार आणि सर्व टीमने पोहोचविली. ११ भाषा अवगत असणारे छत्रपती संभाजी महाराज संस्कृत पंडित, कवी आणि लेखकही होते. त्यांच्यावर चरित्रकारांनी अन्याय केला, मात्र छावा चित्रपटाने तो दूर झाला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते छावा चित्रपटातील कलाकार संतोष जुवेकर आणि इतर कलाकार, प्रोडक्शन टीमचे संजय पाटील यांचे छावा पुस्तक देऊन अभिनंदन करण्यात आले. अभिनेते संतोष जुवेकर यांनी मनोगत व्यक्त करीत आभार मानले. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पणन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी राज्यमंत्री विद्या ठाकूर, विधिमंडळ सदस्य, मुख्य सचिव सुजाता सौनिक, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.