महाराष्ट्राला परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती!… महायुतीच्या कार्यकाळात महाराष्ट्राची घोडदौड अशीच सुरु राहील, हा विश्वास – चंद्रकांत पाटील

मुंबई : महायुतीच्या सत्ताकाळात राज्यात गुंतवणुकीचा वेग प्रचंड वाढत आहे. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर 2024 अखेरचा अहवाल जाहीर केला असून, गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या 9 महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले.
पाटील यांनी माहिती दिली कि, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आतापर्यंत एकूण 1 लाख 39 हजार 434 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक राज्यात आली आहे. हा गेल्या 10 वर्षातील विक्रम आहे. विशेष म्हणजे या आर्थिक वर्षातील एक तिमाही आणखी बाकी आहे. परकीय गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रावर आणि महायुती सरकारवर दाखवलेला हा विश्वास आहे. या यशाबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचे हार्दिक अभिनंदन. महायुतीच्या कार्यकाळात महाराष्ट्राची घोडदौड अशीच सुरु राहील, हा विश्वास असल्याचे पाटील यांनी म्हटले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीची आकडेवारीच सादर केली. त्यांनी त्यासंदर्भातील अधिक माहिती देणारे खास ट्विट केले. त्यानुसार, केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर 2024 अखेरचा अहवाल जाहीर केला असून, गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या 9 महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली आहे. 2024-2025 या आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यात आतापर्यंत एकूण 1,39,434 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली आहे. ही गेल्या 10 वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक आहे, असे म्हटले आहे.