मौजे पैजारवाडी येथे शिक्षण महर्षी पांडुरंग हिरवे गुरुजी व शिक्षणव्रती भार्गव देशपांडे गुरुजी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी कोल्हापूर येथील शिक्षण महर्षी पांडुरंग हिरवे गुरुजी व शिक्षणव्रती भार्गव देशपांडे गुरुजी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला.अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे सायंकाळी 5.30 च्या सुमारास कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता श्रीक्षेत्र पैजारवाडी (ता. पन्हाळा) येथील शिक्षणमहर्षी पांडुरंग हिरवे गुरुजी व भार्गव देशपांडे गुरुजी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी फडणवीस म्हणाले कि, एक शिक्षक संपूर्ण समाज बदलू शकतो. शिक्षण महर्षी पांडुरंग हिरवे गुरुजी व शिक्षणव्रती भार्गव देशपांडे गुरुजी यांनी तत्कालीन समाज घडविण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. या दोघांनी नवीन समाजाची निर्मिती करण्याबरोबरच शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कार्य केले असल्याचे गौरोवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुख्यमंत्री म्हणाले की, शिक्षण हे व्यक्तीला घडविते. सुसंस्कृत समाज निर्मितीला सहाय्यभूत ठरते. या ठिकाणी उभारण्यात आलेले या दोन्ही मान्यवरांचे पुतळे समाजाला प्रेरणा देतील.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे पारंपारिक पद्धतीने धनगरी ढोलाच्या गजरात स्वागत करण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांची परमपूज्य सदगुरु चिले महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
याप्रसंगी मंचावर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उद्योग व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार धनंजय महाडीक, खासदार धैर्यशील माने, आमदार सर्वश्री गोपिचंद पडळकर, डॉ. विनय कोरे, अमल महाडिक, अशोक माने, राहुल आवाडे, शिवाजीराव पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, समित कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी हिरवे कुटुंबियातील बाजीराव हिरवे, तानाजी हिरवे, उल्हास हिरवे, उमेश हिरवे, विनोद हिरवे, प्रमोद हिरवे तर देशपांडे कुटुंबियातील शिक्षणव्रती भार्गव देशपांडे गुरुजी यांच्या पत्नी श्रीमती शैलजा देशपांडे, ऋषीकेश देशपांडे, स्मिता टिपणीस, माधवी देशमुख, अश्विनी भावे, स्वाती खोपकर, मुक्ता देशपांडे व त्यांचे कुटुंबिय तसेच मौजे पैजारवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येन उपस्थित होते.