‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२२-२३ प्रदान सोहळा’ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एसएनडीटी महिला विद्यापीठात उत्साहात संपन्न

73

मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे दिला जाणारा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२२-२३ प्रदान सोहळा एसएनडीटी महिला विद्यापीठात उत्साहात झाला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राज्यातील सहा महसूल विभागांतील प्रत्येकी एका महिलेस या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री व आमदार छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, गायिका अनुराधा पौडवाल आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि,मुलींना उच्च शिक्षण घेताना शैक्षणिक अडचणी येऊ नये, यासाठी कमवा शिकवा योजनेंतर्गत विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत व्हावी यासाठी “कमवा आणि शिका” योजना अधिक प्रभावी करून त्यांना किमान दरमहा दोन हजार रुपये आर्थिक साहाय्य देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. योजनेतील या सुधारणामुळे विद्यार्थिनींना मोठी शैक्षणिक मदत मिळेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले कि, महाराष्ट्र शासनाने १९८५ पासून महाराष्ट्रात क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन, समाजामधे सामाजिक व शैक्षणिक कार्य करणार्‍या महिलांसाठी सुरू करण्यात आलेला हा पुरस्कार २०१३ पासून बंद होता. यावर आपल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमे यांच्या माध्यमातून तसेच मी स्वतः देखील विविध माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याचा लेखाजोखा मांडला. तसेच आज या पुरस्कारांचे वितरण होत आहे याचा मला आनंद आहे. यावेळी पुढील वर्षापासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार ३ जानेवारीला महिला मुक्ती दिन या शासकीय कार्यक्रमात नायगावला (जि.सातारा) वितरीत करावा, अशी मागणी केली. यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील आपली मागणी तात्काळ मान्य करत पुढील वर्षापासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार ३ जानेवारीला “महिलामुक्ती दिन” शासकीय कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगावला येथे वितरित करण्याचे जाहीर केले. त्याबद्दल भुजबळ यांनी चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले.

या पुरस्कारासाठी पुणे विभागातून श्रीमती जनाबाई सिताराम उगले, नाशिक विभागातून डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी, कोकण विभागातून श्रीमती फुलन जोतीराव शिंदे, छ. संभाजीनगर विभागातून श्रीमती मिनाक्षी दयानंद बिराजदार, अमरावती विभागातून श्रीमती वनिता रामचंद्र अंभोरे आणि नागपूर विभागातून श्रीमती शालिनी आनंद सक्सेना यांना १ लाख रुपये आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.