मुंबईसह राज्यातील महिलांसाठी मोफत सुरक्षित आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहांची आमदार चित्रा वाघ यांची सभागृहात मागणी

मुंबई : महिलांचा बरेच वर्षे दुर्लक्षित प्रलंबित असलेला आणि अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न म्हणजे स्वच्छतागृहांचा प्रश्न, जो आज आमदार चित्रा वाघ यांनी विधानपरिषदेत मांडला. मुंबईत 1,820 महिलांसाठी फक्त 1 सार्वजनिक शौचालय उपलब्ध असल्याचे धक्कादायक वास्तव वाघ यांनी सभागृहासमोर मांडले. शौचालयांची अपुरी संख्या, अस्वच्छता आणि सुरक्षिततेचा अभाव यामुळे महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे आज राज्यातील महिलांसाठी मोफत सुरक्षित आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहांची मागणी त्यांनी केली.
चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या कि, शौचालये बांधून त्याचे प्रश्न सुटणार नाहीत. शहरी, निमशहरी व ग्रामीण भागातील महिलांच्या स्वच्छतागृहांचे प्रश्न आणि समस्या वेगळ्या आहेत. हे आधी शासनाने समजून घेतले पाहिजे. त्यासाठी राज्यातील सर्व महिला स्वच्छतागृहांचा शासनाने सर्वे करावा आणि त्यानुसार धोरण आखावे. मुंबईतील वस्ती शौचालयांची दुरवस्था, असुरक्षितता आणि देखभालीच्या मोठ्या खर्चामुळे अनेक संस्था ती चालविण्यास असमर्थ असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
चित्रा वाघ यांनी राज्यात महिलांसाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी स्वच्छतागृहांची निर्मिती व्हावी, यासाठी काही मागण्या आज सभागृहात मांडल्या. यामध्ये वस्ती शौचालयांचे वीज आणि पाण्याचे देयक मुंबई महापालिकेने भरावे अथवा त्यात सवलत मिळावी, गर्दुल्ल्यांच्या त्रासावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस गस्त वाढवावी, राज्यभर QR कोड तक्रार प्रणाली सुरू करून तक्रारींवर त्वरित कारवाई करावी, राज्यभर नियमित स्वच्छतेसाठी ‘स्वच्छता स्कॉड्स’ भरारी पथके नियुक्त करावेत, हॉटेल्स ढाबे व पेट्रोल पंपांवरील अस्वच्छ स्वच्छतागृहांवर कठोर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करावेत, अशा काही मागण्या वाघ यांनी मांडल्या.
सभागृहात या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महिलांसाठी मोफत व सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील दिले.