दिशा सालियन प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका; न्यायालयात जर काही नवीन पुरावे, गोष्टी आल्या तर त्या आधारावर त्या वेळी सरकार निर्णय घेईल

मुंबई : सध्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने खळबळ उडवली आहे. आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून दिशाची हत्या झाल्याचा दावा केला आहे. यावरून राजकीय वर्तुळात जोरदार खडाजंगी सुरू आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे सुरु आहे. अधिवेशनात देखील याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. यावरून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस यांनी आज एबीपी माझा या वहिनीला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केले.
फडणवीस यावेळी म्हणाले, ही सगळी चर्चा कोर्टाच्या केसमुळे सुरू झाली. उच्च न्यायालयात एका वकिलानं याचिका दाखल केली आहे. दिशा सालियनच्या वडिलांनीही एक मुलाखत दिली आहे. शासनाची भूमिका यासंदर्भात पक्की आहे. न्यायालय काय म्हणतंय? न्यायालयात ते काय पुरावे देत आहेत? यावर पुढची भूमिका ठरेल. आत्तातरी शासनाच्या किंवा पोलिसांच्या पातळीवर हा विषय नाही. न्यायालय ज्या प्रकारे आम्हाला आदेश देईल किंवा न्यायालयात जर काही नवीन पुरावे, गोष्टी आल्या तर त्या आधारावर त्या वेळी सरकार निर्णय घेईल. आत्तातरी आम्ही न्यायालयाकडे नजर ठेवून आहोत, असे फडणवीस यावेळी म्हणाले.
दिशा सालियन प्रकरणी तिच्या वडिलांनी काही महत्वपूर्ण मुद्दे मांडले आहेत. दिशा १४व्या मजल्यावरून पडूनही दिशाच्या शरीरावर एकही जखम कशी झाली नाही? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.त्यामुळे दिशानं आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सतीश सालियन यांनी महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे, माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि इतरांवर गंभीर आरोप केले आहेत. शिवाय प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपावण्यात यावा अशी मागणी केली आहे.