अंमली पदार्थविरोधी जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या ‘’नको नशा’’ या गाण्याचे चंद्रकांत पाटील यांच्याकडून कौतुक

पुणे : अंमली पदार्थांचा वाढता वापर सर्वांसाठीच चिंतेचा विषय झालेला आहे. अंमली पदार्थविरोधी मोहीम सुरू केल्यानंतर जनजागृतीसाठी ‘’नको नशा’’ हे गीत भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष मंदार बलकवडे यांच्या माध्यमातून संगीतकार साई-पियुष यांनी संगीतबद्ध केले आहे. अभिनेत्री/ गीतकार अदिती द्रविड यांनी या गीताचे लेखन केले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी या सर्वांची भेट घेतली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सध्या अंमली पदार्थविरोधी मोहीम सुरू केली आहे. सांगली जिल्ह्यानंतर आता पुण्यातही अंमली पदार्थांचा वाढत वापर कमी करण्यासाठी ते वेगवेगळ्या उपाययोजना राबवित आहेत. काही दिवसांपूर्वी कोथरूड येथे “ड्रग्समुक्त कोथरूड” साठी शपथ घेण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आता जनजागृतीसाठी ‘’नको नशा’’ हे गीत संगीतबद्ध करण्यात आले आहे. हे गीत आघाडीच्या सर्व ॲाडिओ प्लॅटफॉर्मवर व सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या गाण्याचे कौतुक करून, अंमली पदार्थविरोधी जनजागृतीसाठी शक्य असतील ते सर्व उपक्रम वेगवेगळ्या माध्यमातून राबविण्यात येतील, असे पाटील यांनी सर्वांना आश्वस्त केले.