उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील मानाचा आद्य जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत मांडला अभिनंदन ठराव

11

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील मानाचा आद्य जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत अभिनंदन ठराव मांडला. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद असून माझ्या राजकीय, सामाजिक जीवनातला हा सर्वोच्च आनंदाचा, समाधानाचा आणि भाग्याचा क्षण आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली असून सर्वसामान्यांचे दुःख दूर करणं हाच माझा धर्म असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले ?

चंद्रकांत पाटील यांनी ठराव मांडताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील मानाचा आद्य जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सभागृहात त्यांचे अभिनंदन केले. एकनाथ शिंदे हे ९ फेब्रुवारी १९६४ रोजी सातारा जिल्ह्याच्या महाबळेश्वर तालुक्यातील अहिर नावाच्या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. त्यानंतर ते ठाण्यात आले. शिवसेनेच्या संपर्कात आले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या संपर्कात येऊन १९८४ साली ते प्रथम शिवसेना शाखाप्रमुख झाले. दोन वेळा नगरसेवक झाले, सभागृह नेता झाले. १९८६ मध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न वरून जो सत्याग्रह झाला त्यासाठी ४० दिवस तुरुंगवास भोगला. २००४ ते २०२५ सलग पाचव्यांदा ते आमदार आहेत. २०१४ ते २०१९ ते मंत्री होते. त्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आहे आणि आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. या सगळ्या कालावधीत त्यांना मिळालेल्या या संधीचं त्यांनी सोनं केलं. अनेक विकासाचे प्रकल्प त्यांनी राबविले. सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाचा त्यांनी संवेदनशीलपणे विचार केला. त्यामध्ये आनंदाचा शिधा, एसटीमध्ये महिलांना ५० टक्के तिकिटाचे दर , ७५ वर्षांपुढील ज्येष्ठाना तिकीट माफ करण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यासारख्य योजना अमलात आणणारा असा एक संवेदनशील माणूस म्हणून पाटील यांनी शिंदेंचे कौतुक केले. शिंदे यांनी वारी या विषयावर देखील भरपूर काम केले. त्यासाठी शिंदे यांचे पाटील यांनी अभिनंदन करत विधानसभेत ठराव मांडला.

एकनाथ शिंदे यांचे छोटेखानी भाषण

एकनाथ शिंदे याबाबत म्हणाले कि, आपल्या छोटेखानी भाषणात म्हणाले की, मला मिळालेला हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही. मला आणि माझ्या कामाला कायम आशीर्वाद देणाऱ्या वारकरी आणि शेतकऱ्यांचा तसेच माझ्या लाडक्या बहि‍णी, लाडक्या भावांचा आहे, असं मी मानतो. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व आणि महाराष्ट्राच्या सेवेचे व्रत मला दिले. धर्मवीर आनंद दिघे यांनी जनसेवेचे संस्कार दिले. तुकोबांच्या नावाचा पुरस्कार हा याच संस्कारांचा सन्मान आहे. या पुरस्काररूपी आशीर्वादामुळे मला कॉमन मॅनला सुपरमॅन करण्यासाठी आणखी बळ मिळो, अशी प्रार्थना मी करतो, असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, ‘भले जरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ या तुकाराम महाराजांच्या पंक्ती मला खूप प्रिय आहेत. एखाद्याने जीव लावला, विश्वास टाकला तर त्याला कमरेची लंगोटी सुद्धा सोडून द्यायची, आणि एखाद्याने दगाफटका केला तर त्याला योग्य मार्गाने वठणीवर आणायचे हीच तुकाराम महाराजांची शिकवण मी आयुष्यभर जपली.

माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मी वारकरी संप्रदायासाठी काही भरीव गोष्टी करु शकलो असं सांगून, उपमुख्यमंत्री म्हणाले की, वारकरी बंधूंचा विचार करुन इतिहासात प्रथमच आमच्या काळात वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी अनुदान दिलं गेलं, वारकरी विमाछत्र योजनेत वारकऱ्यांचा विमा काढण्यात आला, वारीमध्ये लाखो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पालखी मार्ग आणि पंढरपूरच्या विकासाचे कामही मार्गी लागले. विठूरायाच्या दर्शन रांगांसाठी तात्काळ निधी दिला, मंदिर हेच संस्काराचे मुख्य केंद्र आहे. त्यामुळेच ब कॅटेगरीतल्या तीर्थक्षेत्र मंदिराचा निधी दोन कोटीवरून थेट पाच कोटी केला. पहिल्यांदाच वारकरी संप्रदायासाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती केली. वारकऱ्यांपेक्षा कोणी व्हीआयपी नाही. पंढरपूरला आलो तर सगळा व्हीआयपी ताफा बाजूला ठेऊन बुलेटवर फिरलो असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, ही मदत म्हणजे काही उपकार नव्हेत, कारण वारकरी संप्रदायाचे या समाजावरील उपकार कोणी सात जन्म घेतले तरी फेडू शकणार नाही.

संत तुकाराम महाराज यांच्या,‘शुद्धबीजा पोटीं, फळें रसाळ गोमटीं …या उक्तीचा उल्लेख करून उपमुख्यमंत्री म्हणाले की, महायुती सरकारच्या विचारांचे बीज शुद्ध आहे आणि त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारताची, विकासाची गोमटी फळे आपल्याला मिळत आहेत. हा पुरस्कार मला कोणत्याही पदापेक्षा खूप मोठा आहे. वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी कटिबद्ध होतो, आहे आणि सदैव राहीन अशी ग्वाही देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.