स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही; त्यामुळे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने माफी मागितलीच पाहिजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रोखठोक प्रतिक्रिया

95

मुंबई : आजची सकाळ एका नव्या वादाने सुरु झाली. स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते शोमध्ये सादर केले. यावरून एकनाथ शिंदे गट आक्रमक झाला असून कुणाल कामरा विरुद्ध कारवाईची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणात कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी रोखठोक अशी प्रतिक्रिया दिली आहे. स्टँडअप कॉमेडी करण्याचा अधिकार कोणालाही आहे. मात्र, स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की त्यांनी माफी मागितली पाहिजे, असा थेट इशाराच फडणवीस यांनी दिला.

फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले कि, स्टँडअप कॉमेडी करण्याचा अधिकार कोणालाही आहे. मात्र, स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. खरं म्हणजे कुणाल कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्रातील जनतेने २०२४ साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे. कोणाकडे स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विरासत कोणाकडे गेली? हे जनतेने ठरवलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे खालच्या स्थराची कॉमेडी करून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री, वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्याबाबत अनादर करण्याचा अधिकार कोणालाही नाही, हे चुकीचं आह. तुम्ही जरुर स्टँडअप कॉमेडी करा, पण अपमानित करण्याचं काम कोणी करत असेल तर हे सहन केलं जाणार नाही. हे अतिशय चुकीचं आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे. तसेच कुणाल कामरा जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत, ते संविधान जर त्यांनी वाचलं असेल , संविधानाची माहिती असेल तर संविधानाने सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही,अशी प्रतिक्रिया देत फडणवीस यांनी कॉमेडियन कुणाल कामराने माफी मागावी अशी मागणी केली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने त्याच्या खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये शो मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केले होते.  या क्लबमधील खुर्च्यांची आणि संपूर्ण सेटची एकनाथ शिंदेंच्या समर्थकांनी तोडफोड केली आहे. यासोबतच शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही शिवसेनेच्या समर्थकांनी जोरदार निर्देशने केली. त्याचे फोटो देखील जाळण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.