पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे अखेरचे सत्र मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात संपन्न

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आयोजित, शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था प्रस्तुत , ५०० हून अधिक नृत्यांगनांच्या कलेचा आविष्कार असलेल्या, नृत्य गुरु पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे दुसरे पर्व येत्या २२ आणि २३ मार्च रोजी कोथरूड मधील शुभारंभ लॉन्स, डीपी रोड येथे संपन्न झाला. रविवारी या महोत्सवाचे अखेरचे सत्र पार पडले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. विख्यात भरतनाट्यम नृत्यांगना निरुपमा आणि राजेंद्र यांचा डौलदार पदन्यास हे पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाच्या अखेरच्या सत्राचे प्रमुख आकर्षण ठरले. मनिषा नृत्यालयाने कथ्थकच्या माध्यमातून शिवभूषण सादर केले. कलासक्त नृत्य संस्थेने सादर केलेल्या योगिनी या ओडिसी नृत्याविष्कारास आणि उत्तुंग अभिनयाला रसिकांनी भरभरून दाद दिली.
रविवारी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थिती संपन्न झालेल्या शेवटच्या सत्रात मुद्रा कथक नृत्य संस्थेने ‘गणेश ध्रुपद’ (कथ्थक), स्वरदा नृत्य संस्था ‘चरिष्णू’ (भरतनाट्यम्), आरोहिणी नृत्य संस्थेने ‘शिव ध्रुपद’ (कथ्थक), स्नेहललितने ‘तिल्लान’ (भरतनाट्यम्), रुपक नृत्यालयने ‘चतरंग’ (कथ्थक), शिल्पा नृत्यालयाने एक श्लोकी रामायण (कथ्थक), नृत्यांजली संस्थेचे श्री गणेश (भरतनाट्यम्), नृत्यभारती संस्थेचे राग सागर (कथ्थक), कलासाधनम् नृत्य संस्थेचे डमरु (भरतनाट्यम्), अर्चना नृत्यालयाचे ठुमरी (कथ्थक), रुपक कलासदनने अंजनेय स्तुती (भरतनाट्यम्) आदी नृत्याविष्कार सादर करण्यात आले.
पुढील वर्षीचा तिसरा महोत्सव अधिकाधिक भव्यदिव्य करण्यासाठी महाराष्ट्राचा सांस्कृतिक विभाग देखील सहभागी होईल. त्यासोबतच सांस्कृतिक विभागाच्या वतीने आगामी ३६५ दिवस १२०० कार्यक्रम राज्यभर राबविणार असल्याची माहिती आशिष शेलार यांनी यावेळी दिली. समारोप प्रसंगी पंडिता रोहिणी भाटे यांना पुणेकरांनी दिव्याच्या प्रकाशात अनोखी आदरांजली वाहिली.
यावेळी अंजली पाटील, नृत्य गुरु मनिषा साठे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या सर्व पदाधिकारी, आयोजक अजय धोंगडे, संयोजक तथा भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.