वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ‘महाबिघाडी’तील तीनही पक्षांची एकाच दिवसात थोबाडे फुटली, चित्रा वाघ यांचा घणाघात

मुंबई : राज्यात सध्या काही महत्वपूर्ण अशा प्रकरणामुळे अधिवेशनात मोठा गदारोळ निर्माण झाला. एक म्हणजे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील आरोप, दिशा सालियन प्रकरण , तसेच छत्रपती शिवरायांचा आणि छत्रपती शंभूराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर. या तीनही प्रकरणावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. परंतु या तीनही प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत विरोधकांनाच तोंडावर पाडले आहे. यावरून भाजप आमदार चित्रा वाघ यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
चित्रा वाघ यांनी म्हटले कि, राज्यामध्ये नुसते आरोप करत बसलेल्या विरोधी ‘महाबिघाडी’तील तीनही पक्ष वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकाच दिवसात तोंडावर पडले असून गारद तर झाले आहेतच, पण त्यांची थोबाडेही फुटली आहेत. मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून एक कोटीची खंडणी वसूल करणारी महिला आणि तिला साथ देणाऱ्या पत्रकारांशी बारामतीच्या मोठ्याताईंचा म्हणजेच सुप्रिया सुळे तसेच ‘तथाकथित’ युवा नेते रोहित पवार यांचा संपर्क असल्याचे पुरावे मिळाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहाला निक्षून सांगितले. त्यांची बोलती आता बंद झाली आहे.
छत्रपती शिवरायांचा आणि छत्रपती शंभूराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या तेलंगणामध्ये मुसक्या आवळल्या. हे राज्य काँग्रेसकडे असून काँग्रेसच्या नेत्यांनीच त्याला आश्रय दिल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरटकरचा संबंध भाजपा किंवा वरिष्ठ नेत्यांशी जोडणाऱ्यांचे त्यामुळे थोबाड फुटले आहे.
दिशा सालियन हत्याप्रकरणी तिचे वडील सतीश आणि ॲड. नीलेश ओझा यांनी पत्रकार परिषद घेऊन होणारे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आदित्य ठाकरेच काय, उद्धव ठाकरे, परमवीरसिंह, सचिन वाजे यांच्या विरोधातदेखील पुरावे आहेत आणि आमची बाजू अतिशय मजबूत आहे. आरोपींना निश्चितपणे शिक्षा होणार आहे, असे त्यांनी ठासून सांगितले. यावेळी त्यांच्या बाबतच्या ‘ ‘फेक नॅरेटीव्ह’ चा देखील त्यांनी खरपूस समाचार घेतला.
त्यामुळे तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आज शरद पवार गट, उबाठा गट तसेच काँग्रेस पक्ष यांची बिंगे फुटली असून सत्य परिस्थितीआपले डोके वर काढत आहे, आणि या बुडत्यांचे पाय आणखी खोलात चालले आहेत, असे चित्र वाघ यांनी म्हटले.