महायुती सरकारच्या १०० दिवसपूर्ती निमित्त विविध योजनांचा आढावा घेण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न

मुंबई : राज्यातील महायुती सरकारच्या १०० दिवसपूर्ती निमित्त विविध योजनांचा आढावा घेण्यासंदर्भात आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.
चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत विद्यापीठांत सुरू असलेली प्राध्यापकांची पदभरती पूर्ण करणे, विद्यार्थी संपर्क अभियान राबविणे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीला चालना देणे, विद्यापीठांतर्गत विविध विभागांना मानांकन देणे, महा-स्वयं पोर्टलचा शुभारंभ, ई-बोर्ड ऑफ स्टडीज स्थापन करणे, विभागाचा सर्वसमावेशक डॅशबोर्ड कार्यान्वित करणे, अप्रेंटिसशीप एमबेडेड उपक्रम राबविणे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास डिजिटल विद्यापीठात उन्नत करणे, उच्च शिक्षणाचे केंद्र स्थापन करणे आणि नाशिक आदिवासी विद्यापीठाची स्थापना या व अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव संतोष खोरगडे, उपसचिव प्रताप लुबाळ, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.