संतापजनक : पुण्यात दीनानाथ हॉस्पिटलचा मुजोरपणा… पैशाअभावी उपचारासाठी दिला नकार, भाजप आमदाराच्या पीएच्या पत्नीचा अखेर मृत्यू

पुणे : पुण्यात गुरुवारी एक संतापजनक घटना घडली. भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिशा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनात उपचारासाठी दाखल केले असता रुग्णालय प्रशासनाकडून पैशांची अडवणूक केल्याने तनिशा यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तर राजकीय वर्तुळातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात झाली आहे.
सुशांत भिसे यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, तनिशा यांना प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी कुटुंबिय घेऊन गेले.त्यावेळी तेथील डॉक्टरांनी तनिशा यांची तपासणी केली आणि जुळ्या मुली आहेत.तसेच शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असल्याचे कुटुंबियांना सांगण्यात आले. शस्त्रक्रियेकरीता २० लाख रुपयांचा खर्च येईल आणि सुरुवातीला किमान १० लाख रुपये तरी भरावे लागतील, असे कुटुंबियांना डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी भिसे कुटुंबीयांनी आमच्याकडे सध्या २ते ३ लाख असून आम्ही इतर पैशांची जुळवाजुळव करू पण प्रथम उपचार करावे अशी विनंती त्यांच्याकडून करण्यात आली. पण रुग्णालय प्रशासनाने उपचार करण्यास नकार दिला.
दरम्यान तनिशा यांची प्रकृती अधिकच खालवली. त्यानंतर सुशांत भिसे यांनी आपल्या पत्नीला दुसर्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि पण यामध्ये जवळपास तीन तासाचा कालावधी गेला आणि त्या रुग्णालयात तनिशा यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला.पण पुढील काही मिनिटामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेतून दीनानाथ रुग्णालयाचा बेजबाबदारपणा दिसून आला असून रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भिसे कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळेत उपचार दिले असते तर आज हि वेळ आली नसती अशी प्रतिक्रिया कुटुंबियांकडून दिली जात आहे.
याबाबत आमदार अमित गोरखे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले कि, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाकडून मोठी चूक झाली आहे. यामध्ये दोषींना आम्ही कदापि सोडणार नाही. शेवटपर्यंत लढा देऊ आणि माझ्या भगिनीला न्याय मिळवून देऊ. पुणे पोलीस उपायुक्त रंजन शर्मा यांची भेट घेऊन सुशांतजी भिसे यांच्या पत्नी सौ.मोनाली सुशांत भिसे यांच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी सविस्तर चर्चा गोरखे यांनी केली.पोलीस उपायुक्त रंजन शर्मा यांनी योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल व दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासन आणि संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्वासन दिले आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल गरिबांसाठी एक ट्रस्ट म्हणून ओळखले जाते, मात्र इथेच अशा प्रकारे उपचार नाकारले जातात, हे अत्यंत संतापजनक आहे! मंत्रालयाकडून संपर्क होऊनही हॉस्पिटलच्या प्रशासनाने निर्णय झुगारला, असे गोरखे यांनी सांगितले.
या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने मात्र आरोप फेटाळून लावले आहेत. माध्यमांमध्ये अर्धवट माहीतीसमोर आलेली आहे आणि यातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची बदनामी होत आहे. अशी भूमिका मांडत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी मांडली.
या प्रकरणाची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे. आयोगाने आयुक्त, पुणे महानगरपालिका यांना सदर प्रकरणी तथ्य तपासत चौकशी करुन कार्यवाही करण्याचे आणि आयोगास वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश रुपाली चाकणकर प्रशासनाला देण्यात आले आहेत.