एस. के. सरांनी आपल्यातील कार्यकर्तापण नेहमीच जपला – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : ज्येष्ठ विधिज्ञ, सामाजिक कार्यकर्ते सोहनलाल कुंदनलाल जैन अर्थात एस. के. जैन यांचे आज ७५ व्या वर्षांत पदार्पण झाले. त्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एस. के. सरांचा अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा शिवाजीनगर येथील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात संपन्न झाला. या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री पंकजाताई मुंडे, माधुरीताई मिसाळ, राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्यासह इतर मान्यवर आणि एस. के. सरांवर प्रेम करणारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अॅड.एस के जैन यांच्या कार्याविषयी आपले विचार व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एस के जैन यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले. यावेळी एस. के. सरांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याचे पाटील यांनी म्हटले. एस. के. सरांनी आपल्यातील कार्यकर्तापण नेहमीच जपला आहे, प्रत्येक कामात बांधिलकी सदैव जपली आहे. माझ्या पुणे पदवीधरच्या पहिल्या निवडणुकीपासून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू सातत्याने अनुभवले आहेत, अशी भावना यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
समाजाचं समाजाला परत देण्याची भावना नेहमी अंगीकारणारे नामवंत ज्येष्ठ वकील एस. के. जैन यांचे कार्य पुण्याच्या सामाजिक विकासाला पूरक आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. वकिलीसोबतच त्यांनी अनेक क्षेत्रात काम करत असताना विश्वस्ताची भावना कधीही सोडली नाही, आपण मालक नसून विश्वस्ताची जबाबदारी पार पाडत आहोत असे मानून, आपल्याला जी जबाबदारी दिली ती लोकाभिमुख कशी करता येईल या दृष्टीने त्यांनी काम केले. श्री जैन यांचा संपर्क व्यापक असून त्यांनी गरजूंना नेहमी मदतीची केली आहे, असेही फडणवीस म्हणाले.
जैन मनोगतात म्हणाले, हा सत्कार माझा नसून सर्व समाजसेवकांचा सत्कार आहे. समाजाने मला खूप दिलं आहे ते कधीही विसरण्यासारखं नाही. त्यामुळे मी सर्वांचा ऋणी आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जैन यांच्या कार्याची चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, विधीज्ञ, समाज बांधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.