जनसंघापासून पक्षाचे विचार, ध्येय, धोरणे जनतेपर्यंत पोहोचवून संघटन बांधणी करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान

14

पुणे : आज भारतीय जनता पार्टीच्या ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राज्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधून शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास भाजपा पुणे शहर कार्यालयातून दृकश्राव्य माध्यमाद्वारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी जनसंघापासून पक्षाचे विचार, ध्येय, धोरणे जनतेपर्यंत पोहोचवून संघटन बांधणी करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान केला व त्यांच्याप्रति पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

फडणवीस यांनी मार्गदर्शन करताना म्हटले कि, अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर राम नवमीच्या दिवशी पक्षाचा स्थापना दिवस साजरा व्हावा हा एक विलक्षण योगायोग नव्हे, तर एक प्रकारचा ईश्वरी संकेत असून ज्या रामराज्याच्या स्थापनेकरिता आपण सगळे प्रयत्नरत आहोत, त्या रामराज्याची आपली वाटचाल सुरू झाली असल्यानेच आज राम नवमीच्या निमित्ताने आपला स्थापना दिवस साजरा करत आहोत, असा उल्लेख करून फडणवीस यांनी सुरुवातीसच पक्षाच्या सुशासन संकल्पाचे स्मरण केले. महाराष्ट्रात पक्षाचे दीड कोटी सदस्य नोंदविण्याचा संकल्प आपण वेगाने पूर्ण केला असून या दीड कोटी सदस्यांमुळे जगाच्या पाठीवरील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून भाजपा स्थापित झाला आहे, अशा शब्दांत आनंद व्यक्त करून फडणवीस यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. ही सदस्य नोंदणी अत्यंत शास्त्रीय पद्धतीने केलेली असल्यामुळे प्रामाणिक व पारदर्शक ठरली आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

उद्धव ठाकरे यांनी बेईमानी केल्यामुळे एकदा सत्ता गमावली, पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव सेनेचा त्याग करून सोबत आलेल्या एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करून आता तर आपण अभूतपूर्व यश संपादन केले असून भक्कम विजयानिशी कार्यकर्त्यांचे आशीर्वाद, मेहनतीमुळे आज राज्यातील सर्वात मोठ्या, शक्तिशाली सरकारचे नेतृ्त्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाबरोबरच पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचेही आभार व्यक्त केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.