दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील डॉ. सुश्रुत घैसास यांचा अखेर राजीनामा !

पुणे : तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची मागणी अनेकांकडून करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिशा भिसे यांची दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने उपचारांआधीच अनामत रक्कम भरण्यासाठी अडवणूक अडवणूक केल्यामुळे गर्भवती तनिशा यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप भिसे कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चौकशी समिती देखील नेमली. या चौकशी समितीचा अहवाल समोर आला असून यामध्ये भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात रुग्णालय प्रशासन दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. यातच आता ज्या डॉ. सुश्रुत घैसास यांनी १० लाख रुपये या अनामत रकमेची मागणी पेशंटच्या नातेवाईकांकडून केली होती त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
भिसे कुटुंबाने आरोप केला होता की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी उपचारांआधी १० लाख रुपये इतकी अनामत रक्कम भरण्यासाठी त्यांची अडवणूक केली होती. त्यामुळे डॉ. घैसास यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. यामुळे डॉ. घैसास चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते. या चौकशीला कंटाळून घैसास यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आपला राजीनामा रुग्णालयाचे प्रमुख डॉ. धनंजय केळकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
याबाबत माहिती देताना आमदार अमित गोरखे म्हणाले कि, राज्य सरकारने व मंगेशकर कुटुंबाने ज्या उदात्त हेतूने हे रुग्णालय चालू केलं होतं. त्या हेतूला कुठेतरी काळीमा फासण्याचं काम डॉ. घैसास यांच्या कृतीने केला आहे. त्यामुळे आमची मागणी होती की त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. आज त्यांनी राजीनामा दिला आहे. याचाच अर्थ तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात कुठेतरी घैसास यांना अपराधीपणा वाटत होता. त्याच अपराथी भावेतून त्यानी राजीनामा दिला असावा. आपण कुठेतरी चुकलोय ही भावना त्यांच्या मनात आली असेल म्हणून त्यांनी राजीनामा दिला असावा, असे मत गोरखे यांनी व्यक्त केले.