सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आज ‘माझ्या गावचा धडा’ पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

8

सांगली : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली . दरम्यान सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आज ‘माझ्या गावचा धडा’ पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, गाव म्हटलं की प्रत्येकाला आठवणींमध्ये रमून जायला होतं. गाव म्हणजे मातीतल्या माणसांचा जथ्था, जो दुःखाचे अवडंबर करत नाही; अन् सुखाचे बाजार भरवत नाही. देवळातल्या मुक्या खांबातही गावाची कहाणी ऐकायला येते. गावच्या या कहाण्यांमधून मुलांना प्रेरणा मिळावी, यासाठी सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘माझ्या गावचा धडा’ पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गावच्या या कहाण्यांमधून मुलांना प्रेरणा मिळावी, यासाठी या अभिनव उपक्रमामुळे जिल्ह्यातील गावांचा लिखित सांस्कृतिक दस्तऐवज बनण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या मनात गावाबद्दल, गावच्या मातीबद्दल श्रद्धा अधिक दृढ होईल, असा विश्वास यानिमित्त पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला माझ्या गावचा धडा हा उपक्रम कौतुकास्पद असून हा एक पथदर्शी शैक्षणिक उपक्रम असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले. या उपक्रमाद्वारे सांगली जिल्ह्यातील शिक्षकांनी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी गाव, तालुका व जिल्ह्याचे वैशिष्ट्य सांगणारे धडे लिहिले आहेत. यामुळे मुलांना आपल्या गावची, परिसराची, जिल्ह्याची माहिती मिळणार आहे.

यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड व माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.