अंमली पदार्थमुक्त जिल्हा या अभियानांतर्गत सांगली जिल्हा परिषद स्तरावर शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन… स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप

सांगली : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे स्विकारल्यापासून हा जिल्हा अंमली पदार्थमुक्त जिल्हा व्हावा, यासाठी सातत्याने कार्यरत आहे. यासाठी नियमित बैठका घेऊन पाटील यांनी विविध उपाययोजना राबविल्या आहेत. शाळांमध्ये देखील याबाबत जनजागृती व्हावी यासाठी चंद्रकांत पाटील यांनी काही महत्वपूर्ण सूचना दिल्या होत्या. यातूनच शाळांमध्ये विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्यांचा आज पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती देताना म्हटले, अंमली पदार्थमुक्त जिल्ह्याची मोहिम अधिक तीव्र आणि व्यापक बनवण्यासाठी सांगली जिल्ह्यात टास्क फोर्सची देखील नेमणूक करण्यात आली आहे. या अभियानाची जनजागृती व्हावी, यासाठी सांगली जिल्हा परिषद स्तरावर शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निबंध स्पर्धा, जनजागृतीपर रिल्स, जिंगल्स, पोस्टर बनविण्याची स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या या स्पर्धेत तब्ब्ल २,८१७ शाळांनी आपला सहभाग नोंदवला. आज या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन चंद्रकांतनं पाटील यांनी त्यांचा गौरव केला.