विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवन, मुंबई येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक संपन्न

मुंबई : विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विधानभवन, मुंबई येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक पार पडली. या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच स्मारकाचे काम येत्या १५ मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.दरम्यान, सोलापूर विद्यापीठाच्या पदभरती संदर्भातदेखील यावेळी चर्चा करण्यात आली.
सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ क्षेत्राच्या चारही बाजूस वनविभागाचे आरक्षण असल्याने येण्या-जाण्यासाठी रस्ता बांधण्यासंदर्भात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसात वनविभाग, महसूल आणि विद्यापीठातील अधिकारी यांच्याशी समन्वयातून कार्यअहवाल तयार करावा. विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा निर्मितीचे कार्य १५ मे, २०२५ पर्यंत पूर्ण व्हावे तसेच ८०/२० सूत्रानुसार विद्यापीठातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, असे निर्देश यावेळी विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.
दि. ३१ मे, २०२५ रोजी पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आहे. या संदर्भातील उपक्रम आणि कामे वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या पुतळ्याचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण होणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी रस्त्याचे काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने वनविभागाच्या अटी – शर्तीनुसार पुढील एक महिन्याच्या आत कार्यवाही पूर्ण व्हावी तसेच अपेक्षित कार्यवाहीच्या दृष्टिने जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित घटकांशी चर्चा – समन्वय करुन आठ दिवसाच्या आत प्रस्ताव सादर करावा आणि पुढील कार्यवाही पूर्ण करावी, असे सभापती प्रा. शिंदे यांनी सांगितले.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रकाश महानकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.